

कसारा : शाम धुमाळ
कसारा येथील शेकडो घरांना व मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना रेल्वेकडून देण्यात आलेल्या नोटीसांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणावरून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
कसाऱ्यातील अनेक घरे व सुमारे 133 दुकाने रेल्वेच्या जागेत येत नसतानाही नोटीस देण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या नोटीसांमुळे कसाऱ्यात तणावपूर्ण व आंदोलक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज (दि. 15 एप्रिल) दुपारी 3 वाजता खासदार म्हात्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाऊन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पंकज सिंग यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. कसारा येथील मौजे मोखावणे गट क्रमांक 191, 159, 158, 154, 83 या जमिनी रेल्वेने 1921 साली अधिग्रहित केल्याचा दावा केला जात असताना, त्या जमिनींचे 7/12 उतारे अद्यापही इतरांच्या नावावर का आहेत? तसेच रेल्वे नकाशावर फेरफार प्रलंबित का दाखवण्यात येत आहे, असे सवाल खासदारांनी उपस्थित केले. मात्र या प्रश्नांना रेल्वे अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते.
यावेळी रेल्वे प्रशासनाने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली. त्यावर खासदार म्हात्रे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी संपर्क साधून येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी, रेल्वे अधिकारी, लोकप्रतिनिधी व कसारा बचाव कृती समिती यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.
खासदार म्हात्रे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट होईपर्यंत रेल्वेने कोणतीही कारवाई करू नये. तसेच कसारा येथील टपरीधारक व रहिवाशांनी घाबरून जाऊ नये, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीस कसारा बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जयराम बेंडकुळे, कायदेशीर सल्लागार अमर भरीत, शंकर भगत तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित होते.