

नीती मेहेंदळे
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर. कोण होते हे रावरंभा? त्यांचा इतिहास समजून घ्यायला आपल्याला सतराव्या शतकात जावं लागतं. कारण या रावरंभांचे आजोबा म्हणजे फलटणचे महादजी निंबाळकर, साक्षात शिवरायांचे जावई. महाराजांची कन्या सखुबाई ही महादजींची पत्नी. त्यांचा नातू म्हणजे रंभाजी निंबाळकर.
करमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचं गाव. इथली कमळा भवानी किंवा कमलाई देवी व तिचं इतिहासकालीन मंदिर महत्वाचं आहे. कारण त्याचं स्थापत्य आणि बांधण्यामागचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाजी महाराजांचं कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आईभवानी. रंभाजी निंबाळकर हे बरेच वर्षे तुळजापूर इथे आपल्या जहागिरीच्या प्रदेशात वास्तव्यास होते.
या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणून आजही तिथल्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात. मग रावरंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक बनले. तुळजापूरनंतर त्यांनी माढ्याचे माढेश्वरी आणि करमाळ्याचे कमळादेवी मंदिरं बांधली. तुळजापूर आणि माढ्याची मंदिरे किल्ल्याच्या धाटणीची आहेत. परंतु करमाळ्याचे हे कमलाई मंदिर नाविन्यपूर्ण आहे. रंभाजींच्या काळात सुरू झालेलं या मंदिराचं बांधकाम त्यांचे पुत्र जानोजीराव यांनी दाक्षिणात्य पद्धतीने बांधून पूर्ण केले.
इ.स. 1740 ते 1743 च्या दरम्यान रावरंभा जानोजीराव हे रघुजी भोसलेसमवेत दक्षिणेतील त्रिचनापल्लीच्या स्वारीला गेलेले असताना तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामाची गोपुरशैली त्यांना फार भावली. म्हणून जानोजीरावांनी कमळाबाई मंदिरावर दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे बसवली. महाराष्ट्रात सर्वप्रथम मंदिरांना गोपुरे बसवण्याचा मान करमाळ्याच्या रावरंभांकडे जातो.
असं म्हणतात की, या रावरंभा निंबाळकरांच्या जहागिरीत 96 खेडी होती. त्यामुळे 96 या आकड्याला या मंदिरात विशेष महत्व दिसून येते. 96 खांबांनी तोलून धरलेला या मंदिराचा सभामंडप खुला असून आत अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. अंतराळावर वर्तुळाकार भव्य छत आहे. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत 96 दगडी पायर्या आहेत. मंदिराबाहेर प्रदक्षिणापथ असून तिन्ही बाजूंना थोड्या उंच जोत्यावर राहण्यासाठी 96 ओवर्यांचा भक्तनिवास आहे.
त्या ओवर्याही आत सुंदर कमानींनी तोललेल्या दिसतात. मंदिरात सजावटीसाठी 96 भित्तीचित्रे लावली आहेत. म्हणून या मंदिराला 96 कुळी मंदिर असेही म्हणतात. एवढेच नव्हे तर स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली 96 पायर्यांची हत्ती बाव मंदिराच्या परिसरातच आहे. ही बारव अष्टकोनी असून एका बाजूस उतरायला पायर्या आहेत. या प्रचंड विहिरीच्या बांधकामासाठी आलेला खर्च हा मंदिराच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चापेक्षा जास्त आला असावा असे मानतात. ही विहीर इतकी प्रचंड आहे की तिची मोट फिरवायला हत्ती असायचे. या विहिरीमुळे आसपासची अनेक शेते हिरवीगार राहत असत.
मूळ मंदिर हेमाडपंती शैलीचे असून त्याच्या बांधकामावर मुघल स्थापत्याचाही प्रभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते. या मंदिराला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना प्रवेशद्वारे आहेत व त्यांवर गोपुरे आढळतात. संपूर्ण मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, आणि गर्भगृहातील कमलाभवानी माता ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते. तिची मूर्ती गंडकी शिळेतील पाच फुटी उंच अष्टभुजा असून तिने हातांत विविध आयुधे धारण केली आहेत. ती सिंहारूढ असून महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली ती भवानीमाता आहे.
देवीच्या मूर्तीच्या वरील बाजूस उंच शिखर सहास्तरीय असून त्यावर विविध देवी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. तिच्यासमोरच्या वाहन मंडपात आवेशपूर्ण सिंह दिसतो. मंदिर पंचायतन पद्धतीचे असून आजूबाजूला इतर 4 मंदिरे दिसतात. शेजारी महादेवाची पिंड असलेले मंदिर आहे. मागच्या बाजूस असलेल्या मंदिरात गणेशाची काळ्या पाषाणातील प्रतिमा आहे. एका बाजूला गाभार्यात विष्णू - लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागे सूर्यमूर्ती असलेले मंदिर आहे. सात घोड्यांवर आरुढ असलेली आणि अरुण सारथी असलेली सूर्य मूर्तीदेखील मंदिरात आहे.
इथे सात घोडे न दाखवता एकच संपूर्ण घोडा आणि त्याला एका मुखाजवळ सात मुखं दाखवून सात घोडे आहेत, अशी कल्पना शिल्पांकित केलेली दिसते. सूर्य सारथ्याच्या मागे रथात बसलेला असून सूर्याच्या दोन्ही हातांत कमळं असून रथाला एकच चाक आहे. सारथ्याचे मुख उजवीकडे असून सूर्याचे मुख समोर प्रेक्षकांकडे आहे. मंदिरात दोन मोठ्या घंटा असून त्यांवर मराठीत लेख कोरले आहेत. त्यावरून मंदिराचा स्थापत्यकाळ समजायला मदत होते.
मुख्य मंदिरासमोर मोकळ्या जागेत 80 फुटी उंच दीपमाळ असून त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायर्या आहेत. त्याही पुन्हा 96च आहेत. उत्सव काळात रोषणाईसाठी दीपमाळांवरून विजेच्या दिव्यांच्या माळा सोडतात. मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीने साजरा केला जातो तसेच कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थी दरम्यान वार्षिक उत्सव (यात्रा) आयोजित केला जातो. दरवर्षी कमळादेवीची मुख्य यात्रा कार्तिक पौर्णिमेला भरते. या काळात रोज देवीचा छबिना निघतो; परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. रात्री 12 वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी, मानकरी मोठी गर्दी करतात. तुळजाभवानीप्रमाणे येथेही पुजारी आणि सेवेकरी मराठा जातीचे आहेत.
सैराट चित्रपटात झालेल्या चित्रिकरणामुळे हे मंदिर अधिक प्रसिद्धीस आले. राव रंभा निंबाळकर यांची समाधी असलेली मराठाकालीन स्मरण छत्री मंदिर परिसरातच आहे. करमाळामध्ये या मंदिरा- खेरीज खंडोबा, विष्णू, खोलेश्वर. याशिवाय गावात एक भुईकोट किल्लासुद्धा आहे. मजबूत तटबंदी आणि खंदकाने वेढलेल्या या किल्ल्याला एकवीस बुरुज आहेत, त्यांच्यामधील विस्तार सुमारे शंभर किंवा त्याहून अधिक फूट आहे.
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन प्रमुख दरवाजे आहेत. एक दरवाजा पूर्वेला आहे आणि दुसरा विरुद्ध बाजूला आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर मारुती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश तसेच महादेव यांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. या मंदिरांमागील इमारत एकेकाळी राव रंभा निंबाळकर यांचे निवासस्थान होती. परंतु आता ते दिवाणी न्यायालयात रूपांतरित करण्यात आले आहे. ते या परिसराचे कार्यालय म्हणून देखील काम करते. आज किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे. तरी काही प्रवेशद्वारे व बुरुज बरेच चांगल्या अवस्थेत दिसतात. करमाळ्याची मंदिरं, किल्ला संवर्धन आज गावकरी स्वतःहून करायचा प्रयत्न करत आहेत. बारवा स्वच्छ करायच्या मोहिमा राबवत आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.