

ठाणे : मुंबईहुन ठाण्यामधून जाणार्या मुख्य मेट्रो -4 चे काम घोडबंदर भागात प्रगतीपथावर आहे. मात्र या कामामुळे सर्वसामान्य वाहन चालकांची सुरक्षाच धोक्यात आली आहे. घोडबंदर महामार्गावरील कापूरबावडी परिसरात एका कारवर दोन लोखंडी रॉड पडल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही देखील गाड्यांवर लोखंडी रॉड पडण्याच्या घटना घडल्या असून यामुळे एमएमआरडीएचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. (Latest Thane News)
भिवंडीमध्ये मेट्रोच्या कामासाठी लागणारी लोखंडी सळई डोक्यात घुसण्याचा प्रकार घडला होता. ठाण्यातही असे प्रकार वाढले आहेत. काल्हेर परिसरात राहणारे अमोल लाठे हे आपल्या 83 वर्षीय वडिलांना घोडबंदर येथील एका खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र रुग्णालय बंद असल्याने ते पुन्हा कालेरला जात असताना घोडबंदर महामार्गावरील कापूरबावडी परिसरात त्यांच्या कारवार मेट्रोसाठी लागणारे दोन लोखंडी रॉड पडले. हे दोन्ही रॉड आरशावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे हे काम करणार्या एमएमआरडीएचा निष्काळजीपणा मात्र समोर आला आहे.
वडाळा ते कासारवडवली आणि पुढे गायमुख असा मेट्रो -4 मार्गाचे काम सध्या घोडबंदर भागात सुरु आहे. यामुळे दररोजच ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात सेवा रस्ते घेण्याचे कामही सुरु असून यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे. आता अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे सर्वसामान्य वाहन चालकांची सुरक्षा देखील धोक्यात आली असल्याने घडलेल्या दुर्घटना गांभीर्याने घेण्याची मागणी नागरिकांकडून एमएमआरडीएकडे केली जात आहे.