ठाणे : माझ्या मुलांना मी नैसर्गिकरित्या मराठी माध्यमात शिकवले, पण त्यासाठी एक अभिनेत्री असण्यापेक्षा माझ्या या भूमिकेचे आधिक कौतुक होते. माझे सत्कार केले जात आहेत. मी जिथे जाते तिथे एखाद्या प्राणीसंग्रहालयात गेल्यावर जसे प्राणी बघायला लोक येतात. तसे लोक माझ्याकडे पाहतात. मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत घातले म्हणून माझे होणारे सत्कार हे आपल्या मराठी भाषेचे दुर्दैव असल्याची खंत अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी व्यक्त केली. (Latest Thane News)
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वतीने महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या संमेलनात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वर्तमानकालीन आव्हाने’ या विषयावर टॉक शो मध्ये त्या बोलत होत्या. या शो मध्ये ज्येष्ठ पत्रकार राही भिडे ज्येष्ठ लेखिका, इंदुमती जोंधळे, शहा या सहभागी झाल्या होत्या. शिल्पा कांबळे यांनी या शो चे संचलन केले.
आपण आपल्या भाषा आणि स्वातंत्र्याला गृहित धरले आहे, असे मत व्यक्त करून चिन्मयी म्हणाल्या, आपल्या भाषेवर अनेक आक्रमणे झाली तरीही मराठी भाषा टिकली आणि यापुढेही भाषा टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले मन, विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषाच हवी, त्यासाठी मुलांना मातृभाषेतून शिकवायला हवे, पण मातृभाषेत मुले शिकली नाहीतर ती स्मार्ट होणार नाहीत, अशी भीती पालकांना वाटते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
व्यक्त होणं हा प्रत्येकाचा धर्म आहे, पण आता व्यक्त व्हायला भीती वाटेल, अशी सद्यस्थिती असल्याचे भाष्य लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. पारलिंगी समुदायास व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. राही भिडे यांनी माध्यमांमध्ये आता पूर्वीइतके व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही.असे मत व्यक्त केले. भारत हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा देश आहे, त्यामुळे भारतात नेपाळसारखी परिस्थिती उद्भभवणार नाही, तर संविधानिक विचारांनी देशात क्रांती होईल, असे मत चिन्मयी सुमीत यांनी व्यक्त केले.