Kamwari River Crisis
भिवंडी : भिवंडीतील कामवारी नदी ही हिरव्या जलपर्णीचा विळख्यात अडकली असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. यामुळे नदीतील जलचर आणि जलस्त्रोत हे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातून वाहत आलेली व पुढे भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणारी कामवारी नदीवर सध्या जलपर्णीचा विळखा पडल्याने येथे नदी आहे का? निव्वळ हिरव्यागार जलपर्णी असा प्रश्न उपस्थित होत असताना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील कवाड नजीकच्या देपिवली गावाच्या कुशीत उगम पावून ग्रामीण भागातून ३२ किलोमीटरचा प्रवास करीत भिवंडी महानगरपालिकेच्या सिमेवरून वाहत येताना पुढे खाडीत रूपांतर होऊन वसई खाडीत विसावते.
ज्यामुळे नदीपात्रातील जलचर व जलस्रोत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नदी पात्रात जलपर्णी वाढली असतानाच या नदी लगतच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील सायझिंग डाईंग यांचे प्रक्रिया केलेले केमिकलयुक्त पाणी, प्रकल्पातील सांडपाणी थेट नदी व खाडी पात्रात सोडले जात आहे.
शासनाच्या नदी पुनर्जीवन प्रकल्पा अंतर्गत कामवारी नदींचा समावेश केला आहे. परंतु या नदीच्या दुरावस्थेकडे जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण महामंडळ भिवंडी महानगरपालिका या सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होत असतानाच लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था सुद्धा शांत बसून राहिल्याने या नदीकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.