

भिवंडी : भिवंडीत लग्नामध्ये माहेरच्यांनी कमी हुंडा दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी आपसात संगनमत करून भिवंडीतील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही संतापजनक घटना अहमदनगर येथून समोर आली आहे.
याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांवर नारपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत पती गणेश घाडगे (३२), सासू शोभा भास्कर घाडगे (७०), सासरे भास्कर घाडगे (७५), मोठी नणंद राणी वाढणे (३०), लहान नणंद मोनिका मायाडे (२८), महादेव थोरवे (५५) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता ही तालुक्यातील काल्हेर येथील एका कॉम्प्लेक्समध्ये राहते. दरम्यान त्यांचा एप्रिल २०२२ मध्ये गणेश यांच्याशी विवाह झाला. त्या सासरच्यांसोबत एप्रिल २०२२ ते २३ ऑक्टोबर २०२३ रोजी पर्यंत अहमनगर येथील लक्ष्मी कॉलनीमध्ये राहत असतानाच पीडित विवाहितेला माहेरच्या माणसांनी लग्रामध्ये हुंडा म्हणून भेटवस्तू व सोन्याचे दागिने कमी दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळीनी शिवीगाळीसह हाताच्या चापटीने मारहाण करून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला आहे. हुंड्यावरून होणाऱ्या अशा घटना आजही अस्तित्वात असल्याचे हे चित्र आजही समाजात दिसून येत असून या घटनेप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या सहा जणांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शिंदे सरनाईक करीत आहेत.