

टिटवाळा: कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बनेल येथे पतीने अमानुष मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीव्ही डोक्यात फोडल्यानंतर हंड्याने प्रहार केल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश काळुराम वाघे उर्फ गुड्डू (वय 21) याला पत्नी सारिका उर्फ रुक्सार हिच्यावर संशय होता. या संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले.
संतापाच्या भरात सतीश याने घरातील टीव्ही पत्नीच्या डोक्यात फोडला. त्यानंतरही राग अनावर झाल्याने त्याने हंड्याने डोक्यावर प्रहारर करत तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सारिका उर्फ रुक्सार हिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. परिसरातील नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला असून बनेल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अल्पवयीन संसार संशयाच्या विळख्यात अडकून रक्तरंजित शेवटाला पोहोचल्याची चर्चा परिसरात सुरू असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.