

ठाणे: ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, शिळडायघर आणि भिवंडी आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले भंगारांचे गोडाऊन आणि केमिकल कंपन्यांमध्ये वेळोवेळी आगी लागल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
मात्र आता आगीचे हे लोण व्यावसायिक कार्यालय व रहिवाशी इमारती पर्यंत पोहचू लागले आहे. गुरुवारी ठाणे स्थानकासमोरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीत भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला. त्यामुळे वाढत्या आगीच्या घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गुरुवारी पहाटे 3.43 वाजताच्या सुमारास गावदेवी भाजी मार्केट इमारत, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, (प.) या ठिकाणी गावदेवी भाजी मार्केट मध्ये आग लागल्याची घटना समोर आली. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवतांना काळू शंकर गाडेकर (53 वर्षे, ठाणे महानगरपालिका, आरक्षक) आणि सागर शिंदे (43 वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी) या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर सुजित पष्टे आणि समीर जाधव (40 वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, तांडेल) हे दोन जण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेत कार्यालयांमध्ये चोवीस तास सुरू असणारी विजेची उपकरणे व त्यामुळे होणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सांगतात.
ठाण्यात दाटीवाटीने उभारलेल्या इमारती, चाळी व झोपडपट्टी भागात सर्वाधिक आगीच्या घटना घडतात. उन्हाळ्यात वाढती उष्णता व शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याच्या घटनेत अचानक वाढ होते. 20224 मध्ये ठाण्यात 808 तर 2025 मध्ये 735 आगी लागण्याच्या घटनांची नोंद पालिकेकडे करण्यात आली आहे.
तर 2026 या वर्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत अडीचशे पेक्षा जास्त घटनांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेत कार्यालयांमध्ये चोवीस तास सुरू असणारी विजेची उपकरणे व त्यामुळे होणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सांगतात.
आगीच्या वाढत्या घटनांमुळे खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने आता शहरातील मॉल आणि व्यावसायिक व रहिवाशी इमारतीच्या अग्निसुरक्षा यंत्रणेचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बांधकामास परवानगी देतांनाच आगी सारख्या आपत्ती पासून बचावासाठी पुरेशी यंत्रणा सोसायटीत बसवण्यात यावी अशी अट पालिकेकडून घालण्यात येते.
बहुतांश बांधकाम व्यवसायिक ही अट फक्त परवानगी मिळवण्यासाठी मान्य करतात व प्रत्यक्षात कुठलीही अग्नीरोधक यंत्रणा बसवण्यात येत नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सर्व अटी व शर्तींची पूर्तता केली आहे की नाही, याची पडताळणी पालिका प्रशासन करते आणि त्यानंतरच पालिका प्रशासन त्या वास्तूसाठी वापर परवाना देते.
मात्र, बहुतांश वेळा ही पडताळणी फक्त कागदावरच केली जाते. पडताळणी केली तरी सुरुवातीच्या काही वर्षांत हे नियम पाळले जातात, पण त्यानंतर या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. अशावेळी नागरिकांनी देखील आपण ज्या ठिकाणी राहतोय, काम करतोय तिथे पुरेशी सुरक्षा आहे का याची पडताळणी करणे गरजेचे आहे असे जाणकार सांगतात.
आगीच्या विळख्यात वसलेली शहरे
ठाणे, डोंबिवली, कल्याण, शिळडायघर, मुंब्रा, कल्याण, भिवंडी आदी भागात तर आगी बरोबरच सिलेंडर आणि बॉयलर स्फोट होण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर केमिकल कंपन्या आहेत. या केमिकल कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गैस सिलेंडरचे बॉयलर वापरले जातात.
हे सिलेंडर वापरून झाले की ते भंगारात काढले जातात. साहजिकच डोंबिवली शेजारील कल्याण, भिवंडी, शिळडायघर, मुंब्रा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर अशा सिलेंडरच्या भंगाराची गोडाऊन अवैध्यरित्या उभी राहिली आहेत. या भंगारांच्या गोडाऊन मधून गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून विक्री केली जाते.
भंगारात गेलेल्या काही सिलेंडर मध्ये गॅस शिल्लक राहिलेला असतो व तो सिलेंडर तोडतांना त्याचा स्फोट होतो. तर केमिकल कंपन्यांमध्ये देखील वापरले जाणारे बॉयलर वर्षानुवर्ष जुने झालेले आहेत. या केमिकल कंपन्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडर आणि बॉयलर बाबत कुठलेही अग्निशामक धोरण ठरवण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा स्फोटाच्या घटना वारंवार घडतात.