डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या वालधुनी परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने एकाच दिवशी त्याच परिसरात व महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये नकली केस-टक्कलच्या चेष्टेपासून आडनावावरून चिडवण्यापर्यंत आणि लोखंडी रॉड, दगड, लाकडी दांडका तसेच चावा घेण्यापर्यंत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
पहिल्या तक्रारीनुसार, हुकुम यादव (३४) यांना सकाळी ८:१५ च्या सुमारास रस्त्यात ओळखीचे भेटले. सचिन यांना टक्कल पडले असून त्यांनी नकली केस लावले असल्याने हुकुम यांनी सहज चेष्टेत नवीन लूक पाहून केलेली चेष्टा सचिन यांचे भाऊ निखील यांना झोंबली. सकाळी नऊच्या सुमारास हुकुम परतत असताना निखील यांनी शिवीगाळ केली व वाद वाढल्याने निखील यांनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने हुकूम यांच्या डोक्यावर व हातावर रक्तस्त्राव होईपर्यंत प्रहार केले.
तसेच डाव्या दंडाला चावा घेतल्याचाही आरोप हुकुम यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. जखमी हुकूम यांना त्यांचे भाऊ शिवम यांनी तातडीने रुग्णालयात नेल. त्यानंतर म. फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दुसरीकडे, शंकर मंदिराजवळ दर्शनासाठी जाताना अडवल्याचा दावा करत निखील (२३) यांच्या तक्रारीनुसार, परिसरात राहणारे शिवम आणि हुकुम यांनी त्यांना आडनावाने आवाज देऊन चिडवले व शिवीगाळ केली.
जाब विचारताच धक्काबुक्की करत हुकुम यांनी फेकून मारलेला दगड निखील यांच्या डोक्यात लागला. तर शिवम यांनी लाकडी दांडक्याने पाठीत उपट घालून लाथा-बुक्क्यांनी मारल्याचे म्हटले आहे. या झटापटीत गळ्यातील चांदीची चेन कुठेतरी पडल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चांदीची चेन हरवली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंह परदेशी या दोन्ही प्रकरणांचा चौकस तपास करत आहेत. एकूणच सकाळी टक्कल, नकली केस, आडनाव आणि चांदीच्या चेनवरून रंगलेला ड्रामा तपासाअंती कोणत्या निष्कर्षावर पोहोचतो, याकडे वालधुनीकरांच्या नजरा लागल्या आहेत.