Thane Crime : पोर्टल बंद पडल्याने शैक्षणिक स्वप्न भंगले कल्याणच्या विद्यार्थीनीने जीवन संपवले

प्रवेश परीक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
Admission portal issue
पोर्टल बंद पडल्याने शैक्षणिक स्वप्न भंगले कल्याणच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलेpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : एक फॉर्म...एक तारीख...आणि एका घरातील स्वप्न भंगले. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश पोर्टलची मुदत संपल्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड तणावातून कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या १८ वर्षीय अक्षदा भीमसिंग वळवी हिने टोकाचे पाऊल उचलले. या विद्यार्थीनीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून जगाचा निरोप घेतला. उपचारादरम्यान मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात अक्षदाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अक्षदाने मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ कॉस्ट अकाऊंट (BCA) या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे ठरविले होते. या अभ्यासक्रमाची पदवी घेण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश प्रक्रियेची तयारी करून सीईटीची परीक्षा ती चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली होती.

Admission portal issue
Mumbai University ChatGPT: चॅट जीपीटीच्या मदतीने अभ्यास साहित्य निर्मिती; मुंबई विद्यापीठातील प्रकार

बॅचलर ऑफ कॉस्ट अकाऊंट या अभ्यासक्रमासाठी काही दिवसांपासून ती मुंबई विद्यापीठाच्या पोर्टलवर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र मुदतीच्या शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी आणि गर्दीमुळे पोर्टल बंद झाले.आता प्रवेश मिळणार नाही, माझे एक वर्ष वाया जाईल, या विचाराने अक्षदा २-३ दिवसांपासून अस्वस्थ होती.

मानसिक तणावातून तिने उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य प्रशान केले. पोटात मळमळ आणि उलटी होत असल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. आईने अक्षदाला तात्काळ कल्याणमधील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी अक्षदाची विचारपूस सुरू केली. त्यावेळी अक्षदाने तपासणी करणाऱ्या डाॅक्टरांना माहिती दिली.

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठातून बीसीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घ्यायची होती. परंतु प्रवेशाचे ऑनलाईन पोर्टल बंद झाल्याने आपणास धक्का बसला. आपले आता वर्ष फुकट जाईल असे वाटू लागले. त्यामुळे मानसिक तणावातून आपणहे द्रव्य आपण १८ जून रोजी रात्री ११ वाजता आणि १९ जून रोजी सकाळी ११ वाजता अशा दोन्ही वेळी प्यायल्याचे अक्षदाने डाॅक्टरांना सांगितले.

डाॅक्टरांकडून ही माहिती अक्षदाच्या आई/वडिलांना समजली. हा प्रकार ऐकून आई/वडिलांना धक्का बसला. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर अक्षदा राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अक्षदा कल्याण पश्चिमेतील सह्याद्रीनगर परिसरातील एका गृहसंकुलात कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील भीमसिंग नायजा वळवी (५२) हे नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहेत. कुटुंबातील पहिलीच मुलगी पदवीचे शिक्षण घेणार होती. त्यामुळे घरातही अपेक्षा मोठ्या होत्या. भीमसिंग वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार खडकपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अक्षदाच्या मोबाईल, चॅट आणि इतर कागदपत्रांची तपासणी पोलिस करत आहेत. तसेच कुटुंबीयांचे आणि महाविद्यालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदविले जात आहेत.

Admission portal issue
CBSE revaluation controversy: सीबीएसईच्या बारावीच्या उत्तरपत्रिकांची अदलाबदल; विद्यार्थ्यांचा आरोप

करिअर, स्पर्धा, घरातील अपेक्षा आणि सामाजिक दबाव यामुळे हा ताण दुप्पट होतो. एक वर्ष गेले तर आयुष्य संपले, अशी भावना निर्माण होते. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांनी प्रवेश काळात २४ तास हेल्पलाईन, समुपदेशन केंद्र आणि तक्रार निवारण कक्ष अधिक सक्रिय करणे गरजेचे असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाने या घटनेबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता तरी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, तांत्रिक सुविधा आणि विद्यार्थी-मैत्रीपूर्ण बदल होतील, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोणतीही परीक्षा, प्रवेश किंवा शैक्षणिक वर्ष हे जीवापेक्षा मोठे नाही. एका संधीने भविष्य ठरत नाही. जर कुणा विद्यार्थ्याला किंवा पालकांना ताण जाणवत असेल तर मदतीसाठी १४४१६ किंवा टेलिमानस हेल्पलाईन ९१५२९८७८२१ या क्रमांकावर २४ × ७ समुपदेशन करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसह पालक संतप्त

ही घटना कळताच विद्यार्थी संघटना आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोर्टल वेळेवर का बंद केले? सर्व्हर डाऊन, तसेच फी भरण्यातील अडचणींमुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. यासाठी ग्रेस पीरियड किंवा दुसरी संधी का दिली जात नाही? असा सवाल पालक करत आहेत. यंत्रणा माणसांसाठी आहे, माणसे यंत्रणेसाठी नाहीत. प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नका, अशी लक्षवेधी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news