

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण सद्या थांबले आहे. पूर्वीप्रमाणे निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून कुत्र्यांना उचलले जात नाही. परिणामी कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभरात कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा, गोविंदवाडी, वल्लीपीर रोड परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये भटक्या कुत्र्यांनी एकूण ६७ जणांचे लचके तोडले आहेत. यातील काही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत.
कुत्र्यांबद्दल तक्रार केली तरी त्याची दखल केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून घेतली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी कल्याणमध्ये एकाच दिवशी ६७ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांची कबुली दिली. केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन काही लहान मुलांनाही गंभीर जखमी केले आहे. केडीएमसीच्या आरोग्य विभागावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नसल्याचे या घटनांतून अधोरेखित झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत शह/काटशहाच्या राजकारणात आरोग्य विभाग देखिल अडकला आहे. त्यामुळे रूग्ण सेवा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचे स्पष्ट दिसून येते. परिणामी भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे कल्याण-डोंबिवलीकरांकडून सांगण्यात येते.
भटक्या कुत्र्याच्या चाव्यांनी जखमी झालेल्या मोहसिन सय्यद यांनी सांगितले की, दुपारचे जेवण झाल्यानंतर इमारतीखाली येऊन दुचाकी सुरू करून निघण्याच्या प्रयत्नात होतो. तितक्यात एका भटक्या कुत्र्याने आपल्यावर झडप घातली. हुसकावत असतानाच कुत्र्याने पायाला कडाडून चावा घेतला. मोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर कुत्र्याने तेथून पळ काढला. त्यानंतर त्या कुत्र्याने कोळीवाड्यातील चार-पाच जणांचे लचके तोडले. जखमींमध्ये एका महिलेसह बालकाचा समावेश असल्याचे मोहसिन सय्यद यांनी सांगितले. वल्लीपीर रोड परिसरात भटक्या कुत्र्यांनी एकाच भागात पाच जणांना चावा घेतला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सारा प्रकार कैद झाला आहे.
कल्याणात अनेक शाळा आहेत. शाळकरी मुले आपल्या पालकांसोबत पायी ये-जा करत असतात. कुत्रा चावण्याच्या वाढत्या घटनांमुुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराच्या परिसरात एखादे बालक खेळत असेल आणि अचानक भटक्या कुत्र्यांनी त्या बालकावर हल्ला केला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे कोळीवाड्यातील रहिवासी इम्रान सय्यद यांनी सांगितले.
यापूर्वी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकारी दर महिन्याला भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण/नसबंदी करत असत. मात्र आता निर्बिजीकरण केंद्राचे काम पाहणाऱ्या नियंत्रक अधिकाऱ्याचे पत्रीपुलाजवळील निर्बिजकरण केंद्राकडे लक्ष नाही. शहरातील मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम केडीएमसीकडून राबविली जात नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे त्रस्त कल्याण-डोंबिवलीकरांकडून सांगण्यात येते.
कल्याणमध्ये दिवसभरात ६७ जणांना भटक्या कुत्र्यांनी लक्ष केले, हे मान्य आहे. तरीही भटक्या कुत्र्यांचे नियमित निर्बिजीकरण, नसंबदी आणि त्यांना ॲन्टी रेबिज केले जाते. दरमहा जवळपास एक हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांकडून लक्ष केले जाते. अशा भटक्या कुत्र्यांसाठी आणखी एक केंद्र सुरू करण्याचा प्रशासचा विचार असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले.