

सापाड : कल्याण नजिकच्या आंबिवली परिसरात राहणारे डेव्हिड घाडगे (वय अंदाजे 55) यांचा उपचारादरम्यान झालेला मृत्यू आणि त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या बाहेर व्यक्त केलेला संताप यामुळे कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शुक्रवारी रात्री डेव्हिड घाडगे मुंबईतील आपल्या नोकरीवरून कल्याण स्टेशनवर उतरले. दरम्यान स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ते अचानक पडले आणि त्यांना दुखापत झाली. त्यांचा मुलगा तुषार घाडगे यांनी तत्काळ त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथे उपस्थित डॉक्टरी चमूने प्राथमिक उपचार केल्याचे सांगितले जाते. मात्र, कुटुंबीयांचा आरोप आहे की डॉक्टरांनी तपासणीनंतर फक्त “उद्या एक्सरे करून घ्या” असा सल्ला देत रुग्णाला घरी पाठवले. शनिवारी सकाळी डेव्हिड यांना एक्स-रेसाठी पुन्हा रुग्णालयात आणण्याची तयारी सुरू असताना त्यांना अचानक शौचाच्या वेळी अस्वस्थ वाटले आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयात तणावाचे वातावरण
मृत घाडगे यांचे मुलगा तुषार आणि नातेवाईक गौतम मोरे यांनी राणी रुक्मिणी बाई रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. असा आरोप करत जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही आणि पोस्टमार्टमसुद्धा करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने तणाव वाढला.
या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
प्रसाद बोरकर, अतिरिक्त आयुक्त. कल्याण डोंबिवली महानगरपालिका