कल्याण: कल्याण ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. कल्याण आणि मुरबाड तालुक्यामधील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, असा ही दावा आमदार कथोरे यांनी केला आहे.
कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड रोडवरील गोवेली येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींना तातडीने उपलब्ध करुन दिला जावा, यासाठी शिबीर पार पडले. या शिबीर प्रसंगी आमदार कथोरे यांनी उपरोक्त विधान केले.
आमदार कथोरे यांच्या विधानाचा धागा पकडून कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले की, टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार यापूर्वी जिल्हाधिकारी यांना होता.
तो अधिकार आत्ता प्रांत कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे पाठविला तर तो तात्काळ प्रांत अधिकारी स्तरावर तातडीने मंजूर करुन मार्गी लावला जातो. तसेच एखाद्या गावात कूपनलिका खोदण्याचा प्रस्तावही आला तर तो देखील तातडीने मंजूर करुन मार्गी लावला जातो. पाणी पुरवठा ही अत्यावश्यक बाब असल्याने त्या संदर्भातील निर्णय घेताना तातडीने निर्णय घेतला जातो.
प्रांत अधिकारी गुजर यांनी सांगितले की, शासन आपल्या दारी या सरकारी उपक्रमाच्या धर्तीवरच छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविले जात आहे. एकूण सहा महाशिबीरे आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी दोन शिबीरे पार पडली आहे.
आजचे हे तिसरे शिबीर आहे. पुढील महिन्यात आणखीन दोन शिबीरे आयोजित केली जाणार आहे. या शिबीरांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, विविध प्रकारचे दाखले. त्यात उत्पन्नाचे दाखले, वास्तव्याचा दाखला आदी दाखले वाटप केले जात आहेत. या दाखले वाटप शिबीरास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे उपस्थित होते.