Thane Crime : दोन दिवसांत नऊ नशेखोरांवर कारवाई

नशेखोरांची पळता भुई थोडी; अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : कल्याण शहरात तरुणाईला विळखा घालणाऱ्या अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाला आळा घालण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हे प्रकटीकरण शाखांच्या मदतीने मोठी मोहीम हाती घेतली आहे.

मागील दोन दिवसांत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या तब्बल नऊ जणांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून कल्याणमधील नशेखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Crime News
Bombay High Court : बेसमेंट मालकाला सदस्यत्व नाकारता येणार नाही

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या आदेशांनुसार गस्तीवर असलेल्या पथकांनी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा घटक तीनच्या पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्केट, भाजी मंडी आणि पेट्रोल पंपाच्या मागे गांजा सेवन करताना शाकीर शेख (३७) याला गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले, तर त्याच परिसरातील भाजी मार्केट इमारतीजवळ गाळ्यासमोर इब्राहिम सोलकर (२६) याला चिलीममधून गांजा ओढताना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

कल्याण पूर्वेकडे असलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैलासनगर येथील गॅस गोडाऊन जवळील मोकळ्या जागेत सतीश पाटील (३४) याला तंबाखू मिश्रित गांजाचे सेवन करताना अटक करण्यात आली. तर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळील फुटपाथवर मासूम बेकरीसमोर उल्हासनगर येथील मजूर सद्दाम शेख (२७) याला कोळसेवाडी पोलिसांनी पकडले.

Crime News
Palghar Railway News : डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढण्याच्या प्रतीक्षेत प्रवासी

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने रेल्वे स्टेशन समोरील हॉटेलच्या पार्किंगमध्ये रात्रीच्या सुमारास धाड टाकून जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले राहुल भालेराव (२१) आणि सिद्धार्थ अहिरे (२१), तसेच महेंद्र शिंदे (२७) या तिघांना अंधाराचा फायदा घेत गांजा ओढताना रंगेहाथ पकडले. दुसरीकडे गुन्हे शाखा घटक तीनच्या पथकाने खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत तरुण विद्यार्थी देखील नशेच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

आंबिवली स्टेशनजवळील रोहित शेलार (२०) याला चिलीम ओढताना अटक करण्यात आली. तर वडवली गावातील गावदेवी मंदिराजवळ उच्चभ्रू वस्तीत राहणारा अक्षय सोनार (२३) याच्यावरही कारवाई करण्यात आली.

हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी

या सर्व कारवायांमध्ये आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून गांजा भरलेली चिलीम, अर्धवट जळालेला गांजा, काडीपेटी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपींची केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. रविवारी आणि सोमवारी झालेल्या या सलग कारवायांमुळे कल्याणमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अशी मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news