

ठळक मुद्दे
स्मार्ट सिटी कामांना अनधिकृत फेरीवाल्यांचा बस्तान आणि बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा
रिक्षा चालकांच्या मनमानी आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या बस्तानमुळे प्रकल्प विळख्यात
स्मार्ट सिटीतील उड्डाण पुलाचे काम डेडलाईन नंतरही सुरू असल्याची शोकांतिका
सापाड (ठाणे) : योगेश गोडे
कल्याण शहर स्मार्ट सिटीच्या कामासाठी निवडले गेले असले तरी प्रत्यक्षात या प्रकल्पाची कामगिरी संथ आणि अडथळ्यांनी ग्रासलेली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामांना अनधिकृत फेरीवाल्यांचा बस्तान आणि बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असून उड्डाण पुलाच्या डेडलाईन नंतरही काम सुरू असल्याची शोकांतिका निर्माण झाली आहे.
कल्याण शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्प हा विकासाचा महामंत्र ठरणार होता. पण प्रत्यक्षात रिक्षा चालकांच्या मनमानी आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या बस्तानमुळे हा प्रकल्प आज गोंधळ, अडथळे आणि अपूर्णतेच्या विळख्यात अडकला आहे. कल्याण स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा बस्तान आणि बेशिस्त रिक्षावाल्यांची मोकळीक एवढ्या प्रमाणात वाढली आहे की स्मार्ट सिटी कामकाज दिवसभर ठप्प होते.
वाहतूक पोलिस प्रशासन आणि अनधिकृत फेरीवाले पथक डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे, परिणामी उड्डाणपुल दिवसभर काम करणे अशक्य बनले असून ठेकेदारांना रात्री उशिरा १२ वाजेपासून ५ वाजेपर्यंत अवघे पाच तासच काम करण्याची संधी मिळते. या मर्यादित वेळेत होणारे काम प्रकल्पाच्या गतीवर मोठा परिणाम करत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या उड्डाणपुलासाठी प्रशासनाकडून २०२३ ऑगस्टमध्ये डेडलाईन जाहीर करण्यात आली होती. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मुदतवाढ दिली असली तरी मुदत संपून तब्बल दोन वर्षे उलटूनही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा वाढत्या विलंबामुळे धुळीस मिळाल्या आहेत. दैनंदिन वाहतुकीतील गोंधळ आणि वाहतूककोंडी अधिकच वाढत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावर कोट्यवधींचा निधी खर्च होतोय, पण त्याचे फलित कुठे दिसते?
स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचे होत असलेली वर्दल मुले उड्डाणपुलाचे काम दिवसभरात करता येत नाही तर ते रात्री बारा ते पाच वाजेपर्यंतच करता येत असल्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाला दिरंगाई होत आहे. काही जागे संदर्भातील तांत्रिक अडचणी आहे त्या लवकरच दूर करून उड्डाण पुलाच्या कामाला गती देता येईल. उड्डाणपुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे ते लवकरच पूर्ण होईल.
रोहिणी लोकरे, स्मार्ट सिटी अधिकारी
कल्याण शहराला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात, वाहतूककोंडीला उपाय सापडावा आणि शहराला विकासाचा नवा चेहरा मिळावा अशी अपेक्षा होती. परंतु आजच्या घडीला अनधिकृत फेरीवाले आणि रिक्षावाल्यांच्या मनमानीमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाला गती मिळण्याऐवजी तो विलंबाच्या जाळ्यात अडकला आहे. महापालिका फेरीवाले पथक आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडून फेरीवाले व रिक्षावाल्यांवर कारवाई होत नसल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाला सतत दिरंगाईचा सामना करावा लागत आहे.