

नेवाळी (ठाणे) : कल्याण डोंबिवलीतील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी निवडलेल्या कंपनीने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण केली आहे. शहरातील संकलन केलेला कचरा ग्रामीण भागाच्या माथी मारण्याचे पराक्रम कंपनीने सुरू केले होते. कल्याण पूर्वेतील नांदिवली माणेरे रस्त्यालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानावर कंपनीने डम्पिंग ग्राउंड सुरू केले होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर नांदिवली, माणेरे आणि परिसरातील नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडस्थळी धडक दिली आहे. यावेळी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख विजय जोशी यांनी कंपनी प्रशासनाला वाहन फोडून जप्त करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली शहरांना स्वच्छ ठेवण्यासाठी कोट्यवधींचा ठेका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीला ठेका केडीएमसीने दिल्यापासून सातत्याने वाद निर्माण झाले आहेत. आता तर कल्याण पूर्वेत असलेल्या २७ गावातील नांदिवली तलावाच्या जवळील रस्त्याच्या कडेला नवा डम्पिंग सुरू करण्यात आला आहे. कंपनीने सुरू केलेल्या नव्या डम्पिंगमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधीची समस्या निर्माण झाली होती. सण उत्सवांच्या कालखंडात निर्माण झालेल्या दुर्गंधीचा साम्राज्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर शिवसेनेचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी विजय जोशी यांनी डम्पिंगच्या ठिकाणी धाव कंपनीसह केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच तयार केलेले डम्पिंग तातडीने बंद करून टाकण्यात आलेला कचरा देखील उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा हे डम्पिंग सुरू झाल्यास वाहन फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कंपनीने कल्याण डोंबिवली परिसरात सुरू केलेली मनमानी आता समोर येत आहे. मात्र माणेरेसह नांदिवली आणि परिसरातील नागरिकांनी उग्र आंदोलनचा इशारा दिल्यानंतर केडीएमसीसह कंपनीने देखील भूमिपुत्रांसमोर हात जोडले आहेत. कंपनीने शिवसेना पदाधिकारी विजय जोशी यांना पत्र पाठवून निर्माण झालेल्या समस्येबाबत दिलगिरी व्यक्त केली असून साचलेला कचरा तातडीने उचलणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता कंपनी पुन्हा या परिसरात कचऱ्याचे डम्पिंग सुरू करते का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर येणाऱ्या वाहनांवर ग्रामस्थांकडून देखील करडी नजर ठेवली जात आहे.
२७ गावांमध्ये असणाऱ्या नांदिवली, माणेरे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या मैदानात हा प्रकार कंपनीने सुरू केला होता. या डम्पिंगमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात २० पेक्षा अधिक घंटागाड्या रिकाम्या केल्या जात होत्या. मात्र त्यानंतर निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ, शाळा यांसह आरटीओ प्रशासनाला देखील त्रास होत होता. अखेर हे डम्पिंग आता बंद करण्यात आले असल्याची लेखी माहिती कंपनीने दिली आहे.