

डोंबिवली : कल्याणमधील वेणूबाई पावशे विद्यालयाच्या शिक्षिका संगीता मारूती चंदनशिवे (५३) यांचा मृतदेह घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कंपाऊंडबाहेर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी १४ जुलै रोजी त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी गुरूवारी त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणात संगीता यांच्या सहकारी शिक्षकांसह कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला जात असून स्थानिक पोलिसांनी त्या दिशेने तपास चक्रांना वेग दिला आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता चंदनशिवे या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या एलआयसीच्या कामानिमित्त आसनगाव येथे गेल्या. त्यानंतर कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क तुटला. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली.
तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुंबई-नाशिक महामार्ग परिसरात असलेल्या जोंधळे पॉलिटेक्निक स्कूलजवळ आढळले. त्यानंतर मोबाईल बंद झाला होता. आसनगाव येथे त्या कुणाला भेटल्या ? आसनगाव ते घोटी हा प्रवास त्यांनी कुणासोबत केला ? तसेच प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून हत्या केली का ? पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह एसएमबीटी हॉस्पिटल परिसरात टाकला का ? या सर्व कोनातून पोलिस तपास करत आहेत.
मृतदेहावर हाता/पायाला दुखापती झाल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे कल्याणमधील शिक्षकांसह संगीता चंदनशिवे राहत असलेल्या परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळीसह संताप व्यक्त करण्यात येत आहे. चंदनशिवे यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूमागील नेमके कारण शोधून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर सहकारी शिक्षकांनी यातील दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास वाडीवरे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण लहामाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.