Kalyan News : मुंबई-बडोदा महामार्ग भूसंपादनात महाघोटाळा? बल्याणीतील रहिवाशाच्या नावे २ कोटी लाटल्याचा आरोप

चौघांविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा, एका तक्रारीमुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची चर्चा
Kalyan News : मुंबई-बडोदा महामार्ग भूसंपादनात महाघोटाळा? बल्याणीतील रहिवाशाच्या नावे २ कोटी लाटल्याचा आरोप
Published on
Updated on

डोंबिवली : मुंबई-बडोदा महामार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेत बल्याणीतील एका रहिवाशाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून २ कोटी ८ लाख ६० हजार ४७६ रुपयांचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघा दलालांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मोहम्मद शाहिद मिठाईवाला (४६) असे तक्रारदाराचे नाव असून ते कॉम्प्युटर दुरुस्तीचा व्यवसाय करतात. टिटवाळ्याजवळील बल्याणी गावातील गावदेवी मंदिराशेजारील एका चाळीत राहणाऱ्या मोहम्मद मिठाईवाला यांच्या तक्रारीवरून चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan News : मुंबई-बडोदा महामार्ग भूसंपादनात महाघोटाळा? बल्याणीतील रहिवाशाच्या नावे २ कोटी लाटल्याचा आरोप
Kalyan Crime : कल्याणात 'ड्रंक अँड ड्राइव्ह'चा थरार; भरधाव चारचाकीने हातगाड्यांसह पादचाऱ्यांना उडवले!

तक्रारीत काय म्हटले आहे?

मोहम्मद मिठाईवाला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीचा भूसंपादन मोबदला त्यांना पाच वर्षांपूर्वीच मिळाला आहे. मात्र २०२२ मध्ये बल्याणीतील सर्व्हे क्र. ३/४ वरील जमिनीच्या भूसंपादनाचा २ कोटी ८ लाख रुपयांचा निवाडा त्यांच्या नावे कल्याणच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर झाल्याचे त्यांना समजले. प्रत्यक्षात सर्व्हे क्र. ३/४ वरील जमीन आणि त्यावरील नऊ चाळींचा मोबदला यापूर्वीच मूळ जमीनमालकाने घेतला होता. या जमिनीशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्या नावे निवाडा कसा झाला, याबाबत त्यांनी उपविभागीय कार्यालयातून संबंधित नस्तीची (फाईलची) माहिती मागवली. नस्ती तपासली असता, आपण भूसंपादन मोबदल्यासाठी अर्ज केलाच नसताना अर्ज केल्याचे दाखवून त्यावर बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे आढळले. तसेच तिघांसोबत आपला नोटरी केलेला विकसन करारनामा जोडण्यात आला होता. भूसंपादनाची रक्कम साजिद रईस यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आपण संमती दिल्याचे बनावट संमतीपत्रही नस्तीत आढळले. विशेष म्हणजे, या दोन्ही कागदपत्रांमध्ये १० वर्षांचे अंतर असूनही दोन्ही ठिकाणी एकच जुना फोटो वापरण्यात आला होता.

Kalyan News : मुंबई-बडोदा महामार्ग भूसंपादनात महाघोटाळा? बल्याणीतील रहिवाशाच्या नावे २ कोटी लाटल्याचा आरोप
Child Marriage: ठाण्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश

बनावट निवाड्याद्वारे २.०८ कोटी बँक खात्यात वर्ग

डिसेंबर २०२१ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी, आपला सर्व्हे क्र. ३/४ वरील जमीन आणि बांधकामाशी कोणताही संबंध नसताना आपल्या नावाने बनावट निवाडा जाहीर करून २ कोटी ८ लाखांची रक्कम एका व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केल्याचा आरोप मोहम्मद मिठाईवाला यांनी केला आहे. या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीने उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन चाळधारकांचे पुनर्वसन होऊ शकले नाही, त्यामुळे निवाड्यातील १ कोटी ८० लाख ९७ हजार ७४७ रुपये शासनाकडे जमा करण्यास तयार असल्याचे कळवले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ती रक्कम शासनजमा करण्याचे निर्देश दिले.

Kalyan News : मुंबई-बडोदा महामार्ग भूसंपादनात महाघोटाळा? बल्याणीतील रहिवाशाच्या नावे २ कोटी लाटल्याचा आरोप
Thane Drowning Incident: कळवा खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

अनेक गावांत घोटाळ्याचा गौप्यस्फोट

केवळ बल्याणीतील सर्व्हे क्र. ३/४ च नव्हे; तर बल्याणीतील २/११, ६/३, २७/३(अ), ७६/१, ७६/३, ७३/३७ पैकी ७३/३४, ७३/३५, ७३/३६, ७३/४०, १००/८ पैकी, तसेच उंभार्णे, नांदप, मानिवली, वाहोली, रायते गावांतील अनेक सर्व्हे क्रमांकांवर प्रत्यक्षात बांधकामे नसताना ती अस्तित्वात असल्याचे दाखवण्यात आले. एकाच बांधकामाचे दोन ते तीन वेळा निवाडे करून आणि बनावट लाभार्थी उभे करून शासनाची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा गौप्यस्फोट मोहम्मद मिठाईवाला यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. आता पोलीस आणि महसूल विभाग या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर काय कारवाई करतात? याकडे तक्रारदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news