

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील डी. बी. चौकात सोमवारी दुपारी भरधाव स्विफ्ट कारने हातगाड्या, दुचाकी आणि पादचाऱ्यांना उडवून भीषण अपघात घडवला. या अपघातात महिलांसह २ ते ३ पादचारी जखमी झाले असून दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक मद्यधुंद असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव स्विफ्ट कारवरील ताबा सुटल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाड्या आणि दुचाकींना जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्याच्या कडेला वडे तळत असलेल्या एका महिलेवर गरम तेल उडाल्याने तीदेखील गंभीर जखमी झाली. या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापाव, मोमोज आणि भाजीच्या हातगाड्या अक्षरशः उडवून लावल्या. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. चालकाचे वय साधारण ५५ ते ६० वर्षे असून, ब्रेकऐवजी चुकून ॲक्सिलरेटर दाबल्या गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र, कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि ग्लास आढळून आल्याने चालक धावत्या गाडीत मद्यपान करत होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे. खडकपाडा पोलिसांनी कार आणि चालकाला ताब्यात घेतले असून जखमींचे जबाब नोंदवले जात आहेत. अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारसह चालक ताब्यात
भरधाव स्विफ्ट कारने हातगाड्या, दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात महिलांसह ३ जण जखमी झाले. रस्त्याच्या कडेला वडापावच्या हातगाडीला धडक बसल्याने, तेथे वडे तळणाऱ्या महिलेवर गरम तेल उडाल्याने ती भाजली. कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि ग्लास आढळल्याने चालक मद्यधुंद असल्याचा संशय आहे. खडकपाडा पोलिसांनी स्विफ्ट कारसह चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.