

डोंबिवली : कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर यांच्या आदेशाने एका न्यायालयीन प्रकरणात नोटीस बजावण्यास गेलेल्या न्यायालयाच्या दोघा कर्मचाऱ्यांना एका इसमाने अरेरावी केली. तसेच निशाणी स्वीकारण्यास नकार देऊन बाजारपेठ पोलिसांशीही गैरवर्तन केले म्हणून एका इसमाविरूध्द कल्याण जिल्हा न्यायालयातील बेलिफ भावना शेलार यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी कल्याणच्या गायकरपाडा परिसरातील पवारनीचा पाड्यातील एका इसमा विरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बेलिफ भावना शेलार आणि निजाम सय्यद हे कर्मचारी कल्याणमधील गायकरपाडा पवारनीचा पाड्यात न्यायालयीन आदेशाप्रमाणे या भागातील आठ जणांना नोटीस बजावण्यास गेले होते. आठ जणांमधील काही जणांनी नोटीस (निशाणी पाच) स्वीकारली. अन्य एका प्रतिवादी महिलेच्या घरी भावना आणि निजाम पोहोचले. त्यावेळी त्यांनी नोटीसवर नाव असलेल्या महिलेचे घर गाठले. त्या महिलेने आपल्या घराबाहेर बोलविले.
निशाणी पाहून या महिलेच्या पतीने (प्रतिवादीचा जावई) यांनी आम्हाला तुम्ही नोटीस घेऊन आलाच कसे ? असा जाब विचारत निशाणी ताब्यात घेताना कर्मचाऱ्यांनी विरोध करूनही स्वतःच्या मोबाईलद्वारे त्याचे फोटो काढले. फोटो काढण्यास मज्जाव करूनही सदर इसम काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. नोटिसीचे फोटो मोबाईलमध्ये काढू नये असा शासकीय आदेश आहे का ? असे प्रश्न सदर इसम कर्मचाऱ्यांना विचारू लागला. आपण वादीचे दलाल आहात ? असे मोठ्याने ओरडून तो इसम कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला.
नोटीस स्वीकारण्यास संबंधित इसम नकार देत होता. कर्मचाऱ्यांनी प्रतिवादी महिलेच्या घराच्या दरवाजावर नोटीस चिकटण्याचा प्रयत्न केला. त्यालाही इसमाने विरोध केला. तरीही त्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमधून काढणे सुरू केले. तसेच, तु्म्हाला माध्यमांसमोर उघडे करतो असे बोलून अन्य लोकांना बोलावून घेऊ लागला. अशा प्रकारामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊ लागला. त्यामुळे बेलीफ भावना शेलार यांनी ही माहिती न्यायालयीन अधीक्षक संदीप निकम यांना दिली. अधीक्षक निकम यांनी बाजारपेठ पोलिसांशी संंपर्क साधल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले.
त्यांनी नोटीस बजावण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या इसमाला शांत राहण्यास आणि सरकारी कामात अडथळा आणू नका, असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्या इसमाने पोलिसांशीही उध्दट वर्तन केले. न्यायालयीन कर्मचाऱ्यांची नोटीस स्वीकारा, असे पोलिस त्या इसमाला सांगत होते. पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे बेलीफ भावना शेलार यांनी वरिष्ठांच्या आदेशाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.