

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरात राहणाऱ्या तरूणाने काळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. आई/बाबा मला माफ करा...असा व्हॉट्स ॲपवरील स्टेटस् वर मेसेज टाकून या तरूणाने स्वतःचे जीवन संपवून टाकले. भावाने त्याच्या व्हॉट्सॲपच्या स्टेटस् वरील मेसेज वाचल्याने संशय आला. त्याने कुटुंबीयांच्या साह्याने परिसरात शोध घेतला असता तो आढळला नाही. अखेर महात्मा फुले चौक पोलिस आणि मृताच्या कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर तरूणाचा मृतदेह काळा तलावात आढळून आला. त्यामुळे या तरूणाने आत्महत्या केल्याचे उघड झाले.
प्रदीप किसन भोईर (३०) असे मृत तरूणाचे नाव असून कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात असलेल्या हरीओम सोसायटी परिसरात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. नोकरी/व्यवसायानिमित्त कल्याणात राहणारे भोईर कुटुंब हे मुळचे मुरबाड तालुक्यातील शेलारी गावचे रहिवासी आहेत.
नोकरी/व्यवसायानिमित्त ते कल्याण येथे राहतात. या संदर्भात मृत प्रदीपचा भाऊ रमाकांत भोईर याने दिलेल्या माहितीनुसार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास प्रदीप भोईर घराबाहेर पडला. नेहमीप्रमाणे घरी येईल, असे कुटुंबीयांना वाटले. याच दरम्यान प्रदीपने त्याच्या व्हॉट्स ॲपवर स्टेटस् वर टाकला होता. मेसेज वाचल्यावर रमाकांतला शंका आली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण प्रदीपच्या अखेरचे लोकेशन तपासले. तो काळा तलाव परिसरात असल्याचे समोर आले.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी प्रखर प्रकाश झोताच्या साह्याने बेपत्ता प्रदीपचा शोध सुरू केला. तेव्हा तलावात प्रदीपचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन जवानांना यश आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर प्रदीपचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाकडे पाठवून दिला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव अधिक तपास करत आहेत.