Kalyan Crime: 'बाथरूममध्ये मृतदेह ठेवलाय… नळ सुरूये’, प्रेयसीची व्हॉईस नोट; कल्याणात ड्रममध्ये तरुणाचे तुकडे!

कल्याणमधील नीलकंठ सोसायटीतील भयंकर प्रकार, प्रेयसी कोलकात्याला फरार झाल्याची माहिती
Kalyan Crime: 'बाथरूममध्ये मृतदेह ठेवलाय… नळ सुरूये’, प्रेयसीची व्हॉईस नोट; कल्याणात ड्रममध्ये तरुणाचे तुकडे!
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नीलकंठ सोसायटीत घडलेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका तरूणाच्या शरीराचे तुकडे करून ते ड्रममध्ये भरून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर तपास यंत्रणाही हादरली आहे. या प्रकरणी तरूणाच्या प्रेयसीवर हत्येचा संशय असून ती कोलकात्याला पळून गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

     गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोसायटीतील एका फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. रहिवाशांच्या सततच्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटला आतून कुलूप असल्याने पोलिसांना दरवाजा तोडून आत प्रवेश करावा लागला. आत गेल्यानंतर दिसलेले दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

     बाथरुममध्ये एका मोठ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये पोत्यात गुंडाळून तरुणाच्या शरीराचे तुकडे ठेवण्यात आले होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ पंचनामा केला आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. मृतदेहाचे तुकडे उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

    पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या तरूणाची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाचे लहान लहान तुकडे करून ते पोत्यात भरून ड्रममध्ये ठेवण्यात आले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बाथरूममधील नळ जाणीवपूर्वक सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे रक्ताचे डाग पुसले जावेत आणि मृतदेह लवकर कुजावा हा उद्देश असल्याचा संशय आहे.

    ही हत्या तरुणाच्या प्रेयसीने केली असावी असा पोलिसांना ठोस संशय आहे. कारण या दोघेही या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. फ्लॅट सोडून जाताना आरोपी महिलेने घर मालकाला एक व्हॉईस मेसेज पाठवला होता. त्यात बाथरूममध्ये मृतदेह ठेवला आहे आणि नळ सुरू आहे, असा उल्लेख तिने केला होता. या मेसेजच्या आधारावरच पोलिसांनी तिच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

    हत्येनंतर आरोपी महिला थेट कोलकात्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिला पकडण्यासाठी मानपाडा पोलिसांची विशेष पथके कोलकात्याला रवाना करण्यात आली आहेत. तसेच तिच्या मोबाईलचे लोकेशन आणि प्रवासाचा तपशील तपासला जात आहे.

   या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत तरूणाची ओळख अद्याप पटली नाही. तो कोणत्या कामानिमित्त कल्याणमध्ये राहत होता आणि त्याचे आरोपी महिलेशी नेमके कसे संबंध होते याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे नीलकंठ सोसायटीसह मलंगगड रोड परिसरात भीतीचे वातावरण आहे. एका घरात असे काही घडेल याची कल्पनाही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया सोसायटीतील रहिवाशांनी व्यक्त केली. पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर हत्येच्या दिवशी नेमके काय घडले याचा संपूर्ण उलगडा होणार आहे. पुढील तपास मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news