

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर फटका टोळी पुन्हा सक्रिय झाली असून एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या हातावर फटका मारून ३० हजारांचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे.
आंबिवली स्टेशनजवळ बल्लारशहा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाच्या हातावर काठीने फटका मारून चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला.
या प्रकरणी प्रवाशाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी लुटारूला शोधण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.
कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बैलबाजार परिसरात राहणारा सोहेल मेहबुब शेख (२४) हा तरुण या एक्स्प्रेसने कल्याणला येत होता. एक्स्प्रेस कल्याणला येणार असल्याने तो टिटवाळ्यापासूनच सामानासह दरवाजवळ थांबला होता.
दरम्यान कल्याणला पोहोचायला वेळ असल्याने तो मोबाईलवर कुटुंबीयांशी बोलत होता. आंबिवली परिसरात एक्स्प्रेसची गती मंदावताच रेल्वे मार्गालगत लपून बसलेल्या एका चोरट्याने संधी साधली.
दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सोहेलच्या हातावर काठीने जोरदार फटका मारला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याच्या हातातील मोबाईल खाली रुळावर पडला. हा मोबाईल क्षणातच उचलून चोरट्याने पोबारा केला. अचानक घडलेल्या घटनेने सोहेलला मोठा धक्का बसला. त्याने कल्याण लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली आहे.
गस्त वाढविण्याची मागणी...
आंबिवली ते शहाड दरम्यानच्या रुळावर फटका टोळीकडून मोबाईल लांबविण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीसह संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलीस आता या टोळीचा शोध घेत आहेत. या निमित्ताने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सावधगिरीसाठी गाडी मंदावली की, दरवाजापासून लांब राहा. मोबाईलचा वापर टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.