Contaminated Drinking Water: पूर ओसरला; दूषित पाण्याचे संकट कायम

वसई-विरारमधील हजारो कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Contaminated Drinking Water
Contaminated Drinking WaterPudhari
Published on
Updated on

मनवेलपाडा: गेल्या आठवडाभर मुसळधार पावसाने वसई-विरार शहराला अक्षरशः वेढा घातला होता. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. आता पूरस्थिती ओसरली असली, तरी नागरिकांसमोर नव्या संकटाने डोके वर काढले आहे.

पूराचे पाणी भूगर्भातील पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरल्याने अनेक सोसायट्या आणि परिसरातील पिण्याचे पाणी दूषित झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Contaminated Drinking Water
Dabhosa Skywalk: जव्हारमधील कोटींच्या स्कायवॉकला मुर्हूत कधी?

शहरातील अनेक निवासी संकुलांमध्ये पाणी गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि पिण्यास अयोग्य झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. पूराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र आता स्वच्छ पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अनेक ठिकाणी नागरिक बाटलीबंद पाणी विकत घेण्यास किंवा टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्यास भाग पडत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, पूराचे पाणी भूगर्भातील टाक्यांमध्ये मिसळल्यास त्यामध्ये जीवाणू, विषाणू आणि इतर घातक घटक वाढण्याची शक्यता असते. अशा पाण्याचा वापर केल्यास पोटाचे विकार, जुलाब, उलट्या, टायफॉईड, कावीळ तसेच इतर जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून किंवा योग्य पद्धतीने शुद्ध करूनच वापरावे, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

अनेक सोसायट्यांनी आपल्या पाण्याच्या टाक्या तातडीने स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. क्लोरीनेशन, निर्जंतुकीकरण आणि पाण्याची तपासणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांची मदत घेतली जात आहे. तरीही सर्वच ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Contaminated Drinking Water
Kisan Kathore: नऊ वर्षे साथ दिली; यावेळी संयम अपेक्षित होता-आ. कथोरे

दरम्यान, महापालिका प्रशासनाने दूषित पाण्याच्या तक्रारींची दखल घेत विविध भागांत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्याची माहिती दिली आहे. ज्या परिसरात समस्या गंभीर आहे, तेथे टँकरद्वारे स्वच्छ पाणी पुरविण्याचाही विचार केला जात आहे. मात्र नागरिकांच्या मते, ही उपाययोजना अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे पाणीपुरवठा व्यवस्था सुरक्षित करण्याची, भूगर्भातील टाक्यांची नियमित स्वच्छता करण्याची आणि पूरानंतर तातडीने निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दूषित पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.

प्रशासनाने नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पिण्याचे पाणी उकळून वापरणे, टाक्यांची स्वच्छता करणे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि कोणतीही आरोग्यविषयक लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पूराचे पाणी ओसरले असले, तरी त्यानंतर उद्भवलेले दूषित पाण्याचे संकट वसई-विरारकरांसाठी मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news