

कल्याण : रेल्वेच्या विशेष ब्लॉकमुळे कल्याण-कसारा मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने गुरुवारी प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. आंबिवली स्थानकात लोकल सुमारे तासभर उशिराने धावल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर गर्दी करत नाराजी व्यक्त केली. याचवेळी डोंबिवली स्थानकातही लोकल विलंबामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. दोन्ही स्थानकांवरील गोंधळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आंबिवली स्थानकात दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने प्रवासी स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर जमा झाले. लोकल तब्बल तासभर उशिराने धावत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. तसेच लोकल उशिराने धावणार असल्याची किंवा वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलांची योग्य माहिती वेळेत दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
परिस्थिती लक्षात घेऊन आरपीएफ आणि जीआरपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, डोंबिवली स्थानकातही लोकल सेवेतील विलंबामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. रेल्वे प्रशासनाने ब्लॉकदरम्यानच्या बदलांची माहिती प्रवाशांना वेळेत आणि स्पष्टपणे द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.
गैरसोयीबद्दल रेल्वेची दिलगिरी
मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी सांगितले की, टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराचे काम भविष्यात प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी करण्यात येत आहे. कामाच्या काळात काही प्रमाणात गैरसोय होणे अपेक्षित असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, ब्लॉकच्या काळात लोकल सेवेतील बदलांची माहिती स्थानकांवर वेळेत आणि स्पष्टपणे देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.