

ठाणे : असली हिऱ्याच्या नावाखाली प्रयोगशाळेत निर्मित मोजेनाईट खडे विकून तसेच गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना करोडो रूपयांचा चुना लावणाऱ्या कल्याण खडकपाडा भागातील टोरेस ज्वेलर्स या कंपनी विरोधात ठाण्यातील राबोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवल्या गेलेल्या गुंतवणूकदारांनी या प्रकरणी पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
कल्याण येथील खडकपाडा भागात प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीच्या मालकीचे टोरेस ज्वेलर्स नावाचे दागिने व हिऱ्याचे शोरूम आहे. कंपनीने या शोरूमच्या माध्यमातून हिऱ्याच्या दागिन्याच्या नावाखाली हुबेहूब हिऱ्यांसारखे दिसणारे प्रयोगशाळेत निर्मित मोजेनाईट खडे विकून ग्राहकांची फसवणूक केली. तसेच जास्त किमतीचे हिरे व दागिने खरेदी केल्यास त्या गुंतवणुकीवर दर आठवडा 4 ते 11 टक्के परताव्याचे आमिष दाखवून गि-हाईकांना आकर्षित केले.
तसेच गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारांचे नावाने लकी ड्रॉच्या नावाखाली घर, गाडी देण्याचे आमिष दाखवले. अशा आकर्षक योजनेच्या आमिषामुळे शेकडो गुंतवणूकदारांनी त्या योजनेत रक्कम गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र जेव्हा गुंतवणूकदार परतावा घेण्यास गेले असता त्यांना कुठलेही परतावा देण्यात आला नाही. तसेच ग्राहकांनी खरेदी केलेले हिरे देखील नकली असल्याचे समोर आले. त्यानंतर अखेर काही गुंतवणूकदारांनी या प्रकरणी राबोडी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. टोरेस ज्वेलर्सकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे यांनी केले आहे.