

कसारा (ठाणे) : नाशिक–मुंबई महामार्गावरील कसारा घाटात बुधवार (दि.28) रोजी पहाटेच्या सुमारास चोरीने गोमांस वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोला अपघात झाला. नाशिकहून मुंबईकडे जात असताना टेम्पोचा अॅक्सेल तुटल्याने बिबळवाडी वळणावर वाहन पलटी झाले. त्यामुळे टेम्पोच्या दर्शनी भागात डाळिंबाच्या पेट्या व भाजीपाला रचून आतील भागात गोमांस लपवण्यात आल्याचे उघडकीस आले. टेम्पो अपघातानंतर ही पेट्या व भाजीपाला अस्ताव्यस्त पडले, तर अंदाजे 5-6 गोमांसाचे तुकडे रस्त्याच्या बाजूला विखुरले गेले.
या वाहन अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली. माहिती मिळताच कसारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने टेम्पो बाजूला काढला. त्यानंतर अर्धवट भरलेले गोमांस दुसऱ्या पिकअपमध्ये भरून ते चिंतामणवाडी पोलिस चौकीजवळ जमा करण्यात आले. या प्रकरणी कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. टेम्पो चालक अपघातानंतर फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाने गोवंश हत्या प्रतिबंधित केली असतानाही गोमांस तस्करी सुरूच आहे, हे या घटनेतून उघड झाले आहे. भाजीपाला, फळं, फुलांच्या आडून अशी तस्करी होत असल्याचे अनेक प्रकरणांतून समोर आले आहे. मालेगाव, चाळीसगाव, संगमनेर, नाशिक आदी भागांतून गोमांस मुंबईकडे पाठवले जात असल्याचा संशय आहे.
स्थानिकांकडून महामार्गावर दररोज शेकडो गाड्या जात असल्याची माहिती दिली जात असून, नाकाबंदी असूनही अशी तस्करी कशी चालते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चिंतामणवाडी पोलिस चौकीच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गोमांस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांनी अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.