

सापाड : राज्यात सध्या शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून विविध ठिकाणी भव्य जत्रा भरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या दुर्गाडी परिसरातही मोठ्या प्रमाणावर भाविकांचा उत्साह उसळला आहे. मात्र या जत्रेत लावण्यात आलेल्या गगनभेदी पाळणे, झुले आणि खेळणी हेच आता जीवघेणे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.
दुर्गाडी जत्रेसाठी उभारण्यात आलेले अवजड आकाशी पाळणे आणि झुले हे एका खड्ड्यात भराव करून लावण्यात आलेले असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी जमीन भुसभुशीत असून अवजड खेळण्यांचा तोल सांभाळण्यासाठी खाली केवळ दगड आणि लोखंडी सळ्या टाकून तात्पुरता आधार देण्यात आला आहे. त्यातच दररोज पडणार्या पावसामुळे ही जमीन आणखी चिखलमय झाली आहे.
परिणामी खेळण्यांचा सामानाचे बॅलन्स कायम राहील का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. चिखलमय आणि दलदलीसारखी झालेली ही जागा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत आहे.
यावेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक या खेळण्यांचा आनंद घेत आहेत. मात्र भुसभुशीत जमिनीत आधार मिळत नसल्याने कधीही अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, अशी भीती कल्याणकारांनी व्यक्त केली जात आहे.
भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे लक्षात घेता, संबंधित पोलिस प्रशासन, महानगरपालिका व महत्त्वाचे संबंधित अधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करून या पाळण्यांची तपासणी करावी, आवश्यक तेथे नोटीस बजावून असुरक्षित खेळणी त्वरित बंद करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांकडून होत आहे.