

बोईसर ः बोईसर पूर्वेकडील बेटेगाव गावातील सर्वे क्रमांक 121 मधील सुमारे 25 एकरांहून अधिक जमिनीवर विराज प्रोफाइल्स लिमिटेड या कंपनीकडून निर्माण होणारी लोखंडी राख मोठ्या प्रमाणावर शास्त्रविरहित पद्धतीने साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या राखेमुळे परिसरातील पाणी व हवेचे प्रदूषण वाढत असून नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून कठोर अटींसह अंतरिम आदेश जारी केला आहे.
विराज प्रोफाइल्स या कंपनीत लोखंडावर रासायनिक प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. त्यातून निर्माण होणारी लोखंडी राख ट्रकद्वारे तारापूर औद्योगिक क्षेत्रातून बेटेगाव येथील भूखंडावर आणली जाते. वाहतुकीदरम्यान ट्रकमधील राख झाकली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळ हवेत उडून वातावरण दूषित होत असल्याची तक्रार शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती.
या तक्रारीनंतर 8 ऑगस्ट रोजी मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी लोणे यांनी पाहणी केली असता गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. राख साठवण्यासाठी योग्य कंपाऊंड वा बॅरिकेडिंग नव्हते, धुळ नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती, गेल्या काही महिन्यांपासून 10 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त राख खुल्या पद्धतीने साठवून ठेवली होती. तसेच या राखेतून होणारी द्रव गळती जवळच्या नैसर्गिक नाल्यात मिसळत असल्याचे आढळून आले आहे.
याशिवाय राखेची विषारी तपासणीही करण्यात आलेली नव्हती. या सर्व बाबींचा अहवाल 14 ऑगस्ट रोजी प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आणि 20 ऑगस्ट रोजी कंपनीला नोटीस देण्यात आली आहे.यानंतर 3 सप्टेंबर रोजी कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी ठाणे येथे वैयक्तिक सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये कंपनीने सादर केलेल्या उत्तरावर आधारित मंडळाने कठोर अटींसह अंतरिम आदेश दिला आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत सामाजिक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोखंडी राखेमुळे भूगर्भातील पाणी व पर्यावरण धोक्यात आले आहे. तरीसुद्धा प्रदूषण विभागाकडून केवळ थातूरमातूर कारवाई करून कारखान्याला पाठीशी घातले जात आहे, असा आरोप शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केला आहे.
प्रादेशिक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, कंपनीने घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन केले नाही, तर वीज व पाणीपुरवठा खंडित करून कारखाना बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.