

Back-to-back accidents in Kalyan
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील सर्वाधिक वर्दळीच्या काटेमानिवली परिसरातील उतारावर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी दोन डंपर रस्ता दुभाजकला धडकले असल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.
महिन्यातून दोन ते तीन वेळा काटेमानिवलीच्या उतारावर विजयनगर भागात असे अपघात होत असल्याने हा उताराचा भाग समतोल करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
काटेमानिवलीचा भाग हा उंच टेकडी सदृश्य आहे. टेकडीचा काही भाग समतल करून या भागात रस्ता तयार करण्यात आला आहे. या टेकडीचा भाग उताराचा असल्याने आहे त्या उतारावरून रस्ता बांधण्यात आला. त्यामुळे काटेमानिवली विजयनगर भागात रस्त्याला उभा चढाव आणि खोल उतार आहेत.
या रस्त्यावरून अवजड वाहन उतरताना चालकाला अतिशय काटेकोरपणे वाहन उतरावे लागते. वाहन उतरत असताना ब्रेक निकामी झाला तर वाहन उतारावरून घरंगळत समोरील दुकाने, दुभाजकला धडकते. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत असे प्रकार सलग तीनदा घडले आहेत.
मंगळवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाची कचरावाहू गाडी या भागातील रस्ता दुभाजकाला धडकली होती. सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झाले नाही. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी एक अवजड डंपर उतारावरून उतरत असताना रस्ता दुभाजकाला धडकला.
ब्रेक निकामी झाल्याने चालकाने थेट रस्ता दुभाजकाला धडक देऊन आपली बाजू सुरक्षित करून जीवित हानी टाळली. तथापी एखाद्या चालकाला हे शक्य झाले नाही तर मोठी जीवित हानी होऊ शकते. हा रस्ता पादचारी, व्यापारी, शाळकरी मुले, पालकांनी नेहमीच गजबजलेला असतो, असे स्थानिकांनी सांगितले. दोन महिन्यापूर्वी याच उतारावरील एक टेम्पो बाजुच्या दुकानात घुसला होता. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला होता.
काटेमानिवली परिसरातील उताराचा रस्ता समतोल करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि या भागात दररोज होणारे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले आहे.
केडीएमसीच्या ड कार्यालयासमोरील उताराचा भाग कमी करून तेथे समतोल रस्ता तयार करण्यात यावा, यासाठी आपण केडीएमसीकडे पाठपुरावा करणार आहोत, असे शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले.
जीवित हानी टाळण्यासाठी या अपघातग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. या भागातील उंचवटा भाग काढून टाकण्यात यावा, यासाठी आपणही केडीएमसीच्या आयुक्तांना पत्र देणार असल्याचे या भागाच्या माजी नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितले.