

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने महासभेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्व पक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावला आहे. पाणी विषयावर एक विशेष महासभा घेण्याची मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली आहे. या मागणीला महापौर हर्षाली चौधरी यांनी अनुमती दर्शविली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना यंदा पाणी दरवाढीचा फटका सहन करावा लागणार नाही.
राज्य सरकारने सुचित केलेल्या पत्रकानुसार हा दरवाढीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला शिंदे सेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी कडाचून विरोध केला. महापालिकेने पाणी गळतीचे लेखा परिक्षण केले आहे. हे लेखा परिक्षण किती वर्षानी करणे अपेक्षित आहे? या प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाकडून सांगण्यात आले की, दर पाच वर्षांनी लेखा परिक्षण होणे गरजेचे आहे. महापालिकेने पाणी गळतीचे लेखा परिक्षण करण्याचे आदेश 2018 साली दिले होते.
त्याचा अहवाल 2022 मध्ये आला आहे. लेखा परिक्षणाकरीता चार वर्षे लागली. या लेखा परिक्षण अहवालापश्चात पुन्हा चार वर्षे लोटली आहे. जुन्या लेखा परिक्षणाच्या आधारे पाणी दरवाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. नव्याने पाणी गळती लेखा परिक्षण झाले पाहिजे. महापालिका हद्दीती किती बेकायदा मालमत्ता आहे. त्यांना नळ जोडणी दिली आहे का? ही नळ जोडणी कश्याचा आधारे दिली आहे. त्यांना दंडात्मक रक्कम आकारून पाणी जोडणी दिली आहे का ? याची पूरेपूर माहिती महापालिका प्रशासनाकडून मांडण्यात आलेली नाही. भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पाणी दरवाढीचा प्रस्ताव 20 फेब्रुवारी पूर्वी का मांडला गेला नाही ? हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. शिंदे सेनेच्या नगरसेविका माधूरी काळे यांनी बेकायदा बांधकामांना एका रात्रीत नळ जोडणी दिली जाते. अधिकृत बांधकामाला नळ जोडणी दिली जात नाही.
महापालिका हद्दीत 22.34 टक्के गळती आहे. जागतिक निकषांनुसार 15 टक्के गळती चालू शकते. महापालिका हद्दीत सात टक्के पाणी गळती जास्त आहे. यापूर्वी गेलेल्या लेखा परिक्षण अहवालानुसार 21 टक्के गळती होती. ही गळती नसून एक प्रकारे चोरी आहे. ही चोरी रोखण्याएवजी इमाने इतबारे पाणी बिल भरणाऱ््यांच्या माथी पाणी दरवाढ लादणे कितप योग्य आहे असा सवाल गटनेते राणे यांनी उपस्थित करुन प्रशासनाची बोलतीच बंद केली. भाजप नगरसेविका खुशबू चौधरी यांनी रस्ते विकास कामाकरीता खोदकाम करताना नळजोडण्या तुटल्या आहे. ही पाणी गळती प्रशासनाकडून रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही.
नालेसफाईचे काम करणारे कंत्राटदार हे तेच तेच आहे. कंत्राटदार कंपन्यांची नावे बदलून समोर येतात. कंत्राटदाराच्या कंपनीचे नाव बदलते. काम करणारा तोच असतो. त्यामुळे नाले सफाईचे काम योग्य प्रकारे न होता. केवळ नालसफाईची बिले लाटली जातात अशा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केला आहे. शिवसेना शिंदे गटाचेच्या नगरसेविका माया कांबळे यांनी सांगितले की, आमच्या प्रभागात वालधूनी नदीचे पात्र अतिक्रमित केले गेले आहे. या नदी पात्रात आत्ताच कचरा खच्चून भरला आहे. त्याची योग्य प्रकारे सफाई केली गेली नाही तर पावसाळ्यात पूर सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. वालधूनी नदी किनारी असलेल्या जवळपास 40 हजार लोकवस्तीला पूर सदृश्य परिस्थितीचा फटका बसतो. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक निलेश शिंदे यांनी सांगितले की, आयुक्तांनी गतवर्षी नालेसफाईच्या कामावर चांगले लक्ष ठेवले होते. त्यामुळे यंदाही त्यांचा असाच वचक असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदाची मागणी केली आहे. त्यापैकी सभागृह नेते पद भाजपला मिळाले आहे. आत्ता स्थायी समिती सदस्य नियुक्त केल्यावर स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहिर केली जाईल. त्यामुळे स्थायी समिती सभापती पद भाजपला मिळणार की नाही ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.