KDMC Swine Flu Patients | कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे दोन्ही रूग्ण धोक्याबाहेर; प्रकृती स्थिर

परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचे आवाहन
Swine Flu
Swine FluPudhari
Published on
Updated on

Kalyan Dombivli Health Alert

डोंबिवली :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एका खासगी रूग्णालयात स्वाईन फ्लू अर्थात H1N1 चे दोन रूग्ण आढळून आले होते. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. संबंधित दोन्ही रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत आहेत.

या संदर्भात बोलताना वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले की, स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे. बाधित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो. या आजारात प्रामुख्याने तीव्र ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, अंगदुखी आणि अशक्तपणा अशी लक्षणे रूग्णांमध्ये दिसून येतात. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Swine Flu
Kalyan-Dombivli News : बारवी धरण ७६.४० टक्के भरले; ओव्हरफ्लोसाठी अवघे २.९० मीटर बाकी

आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतःहून कोणतेही औषध न घेता त्वरित महानगरपालिकेच्या कल्याणातील रूक्मिणीबाई रूग्णालय, डोंबिवलीतील शास्त्रीनगर सामान्य रूग्णालय तसेच महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी व उपचार करून घ्यावेत.

 स्वाईन फ्लूपासून बचावासाठी नागरिकांनी काही आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना रूमाल किंवा टिश्यूचा वापर करणे, संतुलित व पौष्टिक आहार घेणे, भरपूर पाणी पिऊन शरीरात पुरेशा प्रमाणात द्रव ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मास्कचा वापर करणे आणि आजारी असल्यास अनावश्यक बाहेर न पडणे यांचा समावेश आहे.

Swine Flu
Kalyan Dombivli Rainfall | अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळांना 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महापालिका रूग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news