

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती सोमवारी पार पडलेल्या महासभेत करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी चुरस आहे. कारण भाजपने स्थायी समिती सभापती पदावर दावा सांगितला आहे. एकीकडे सभापती कोण होणार ? अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे पहिल्यांदाच महापालिकेच्या इतिहासात महिलेला स्थायी समिती सभापती पद मिळणार का ? अशी चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महापालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची नियुक्ती सोमवारी पार पडलेल्या महासभेत करण्यात आली. सगळ्यांची नजर स्थायी समिती सदस्य निवडीवर होती. शिंदे सेने कडून गजानन पाटील, महेश गायकवाड, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे आणि मनसेचे गणेश लांडगे यांची नियुक्ती झाली. तर भाजपचे दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेंडणेकर, नंदू म्हात्रे, उपेक्षा भोईर आणि उद्धव ठाकरे सेनेचे विशाल गारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेची आर्थिक तिजोरी स्थायी समिती असते. या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती हव्यात, असे प्रत्येक पक्षात चढाओढ असते. सध्या महापौर पद शिंदे सेनेकडे आहे. तर उपमहापौर पद भाजपकडे आहे. त्या पश्चात ही भाजपने स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पदावर दावा सांगितला आहे. काल पार पडलेल्या महासभेत सभागृह नेते पदी भाजपचे वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपची एक मागणी मान्य झाली. स्थायी समिती सभापती पद आत्ता शिंदे सेनेकडे जाणार की भाजप पुन्हा यासाठी राजकीय रणनिती आखणार? या दोन्ही पक्षाने तीन महिलांना स्थायी समितीमध्ये पाठविले आहे.
शिंदे सेनेने एक तर भाजपने दोन नगरसेविका नियुक्त केले आहे. स्थायी समिती सभापती पदांसाठी महेश गायकवाड, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विकास म्हात्रे यांची नावे चर्चेत आहे. तर भाजपला हे पद गेले तर दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड यांची नावे देखील चर्चेत आहेत. ही नावे चर्चेत असली तरी यंदा सभापती पद लाडक्या बहिणीला दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कारण शिंदे सेनेने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापौर पदी लाडक्या बहिणींना संधी दिली आहे. यंदा स्थायी समिती सभापती पदी ही लाडक्या बहिणीला मान दिला जाऊ शकतो. हा मान दिला तर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला नगरसेविका स्थायी समिती सभापती विराजमान होऊ शकते.