Mumbai Police Salary Scam - मुंबई पोलिसांच्या वेतन घोटाळ्यात डिजिटल पुराव्यांचा शोध

बनावट कर्मचाऱ्यांच्या खात्यांची चौकशी; सेवार्थ प्रणालीतील इलेक्ट्रॉनिक नोंदींची सखोल छाननी
Mumbai Police Salary Scam
Mumbai Police Salary Scam
Published on
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कथित वेतन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने तपासाचा वेग वाढवला असून, आता डिजिटल पुराव्यांच्या आधारे संपूर्ण गैरव्यवहाराचा मागोवा घेतला जात आहे.

ठोस पुरावे हाती आल्यानंतर लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कथित १० बनावट कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन जमा झाल्याचा संशय असलेल्या बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सेवार्थ प्रणालीतील इलेक्ट्रॉनिक नोंदी, लॉगिन माहिती, बँक व्यवहार आणि डेटा फेरफाराचा तपशील तपासला जात आहे. तपास पथक सेवार्थ प्रणालीतील ऑडिट ट्रेल, युजर लॉगिन, सर्व्हर लॉग, वेतन मंजुरीशी संबंधित डिजिटल नोंदी आणि प्रणालीतील बदलांचा इतिहास (चेंज हिस्ट्री) यांची सखोल पडताळणी करत आहे.

कर्मचारी माहितीमध्ये नेमक्या कोणत्या टप्प्यावर बदल करण्यात आले, त्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याचे लॉगिन वापरण्यात आले आणि वेतन मंजुरीची प्रक्रिया कशी पूर्ण झाली, याचा तपास सुरू आहे. मूळ नोंदी आणि त्यानंतर बदललेल्या नोंदींची तुलना करून अनधिकृत फेरफार झाला का, याचीही छाननी केली जात आहे. याशिवाय, ज्या बँक खात्यांमध्ये कथित वेतनाची रक्कम जमा झाली, त्या खात्यांचा आर्थिक मागोवाही घेतला जात आहे.

खाते उघडताना सादर करण्यात आलेली कागदपत्रे, खातेदारांची ओळख, वेतनाची रक्कम जमा झाल्यानंतर ती पुढे कुठे आणि कोणाकडे हस्तांतरित झाली, तसेच त्या व्यवहाराचा अंतिम लाभार्थी कोण होता, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. संबंधित खातेदारांकडूनही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास केवळ पाच आरोपींपुरता मर्यादित राहणार नाही.

डिजिटल पुरावे, बँक व्यवहार आणि चौकशीतून समोर येणाऱ्या नव्या धाग्यांच्या आधारे इतर अधिकारी, कर्मचारी किंवा बाहेरील व्यक्तींचा सहभाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित विभागातील काही कर्मचाऱ्यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशीही सुरू आहे.

मुंबई पोलिसांच्या वेतन व्यवस्थापनाशी संबंधित या प्रकरणामुळे पेरोल प्रणालीची सुरक्षितता, अंतर्गत लेखापरीक्षण आणि आर्थिक नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news