

कल्याण : सतीश तांबे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक पालिका निवडणुकीच्या 122 सदस्य निवडीसाठी 122 जागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर करण्यात आली. पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतल्या जाणार असून चार प्रभागाचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या विविध प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीमुळे सर्वच पक्षातील इच्युकांसह नागरिक संभ्रमात पडले आहेत.
कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगर रचना, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वत्रिक पालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. पालिकेत प्रथमच बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार घेतली जाणार असून या निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
अनेक इच्छुकांमुळे रस्सीखेच वाढली आहे. यामुळेच माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी सोडत प्रक्रिया पाहण्यासाठी सभागृहात एकच गर्दी केली होती. प्रभाग आरक्षण सोडत कशा पद्धतीने जाहीर केली जाणार याबाबत सर्वच संभ्रमात पडले होते. गत पालिका निवडणुकीतील तत्कालीन चार प्रभागांना एकत्रित करून एकच प्रभाग तयार करीत या एकत्रित प्रभागाच्या पॅनल क्रमांक दिले आहेत.
प्रत्येक प्रभागातील चार सदस्य निवडीसाठीच्या चार जागासाठी अ, ब, क, ड अशा जागा विविध प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढून जाहीर केली. त्यामुळे मागील निवडणुकीतील प्रभागाची नावे वगळली गेल्याने त्या-त्या प्रभागातील माजी नगरसेविकांसह इच्छुकही आपले प्रभाग सुरक्षित आहेत का, हे पाहण्यास इच्छुक उपस्थित होते. मात्र आरक्षणाचे चित्र स्पष्ट होत नसल्याने अनेकजण बुचकळ्यात होते.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 122 सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यंदाची पालिका निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून 122 सदस्य निवडीच्या जागासाठी चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. 29 प्रभाग चार सदस्यीय तर 2 प्रभाग 3 सदस्यीय असे 31 प्रभाग संख्या असणार आहे. 31 प्रभागातील 122 जागापैकी 12 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, 3 जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, 32 जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी तर उर्वरित 75 जागा सर्वसाधारण वर्गासाठी असणार आहेत.
एकूण 122 जागांपैकी 61 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. पालिकेच्या निवडणूक विभागाने आज जाहीर केलेल्या सोडतीत 122 जागांतील नागरिकांचा मागास प्रवर्गातील 32, अनुसूचित जाती प्रवर्गातील 12, अनु.जमाती प्रवर्गातील 3 अशा 47 जागांसह सर्वसाधारण वर्गातील 75 जागाचे 31 प्रभागातील असून या जागांपैकी 6 जागा अनुसूचित जाती (महिला), 2 जागा अनुसूचित जमाती (महिला), 16 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व 37 सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
17 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप
आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत प्रारूपावर होणार हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. सूत्रसंचालन निवडणूक विभाग उपायुक्त समीर भूमकर यांनी केले.
आरक्षण सोडत जाहीर तक्ता
कल्याण डोंबिवली महापालिका
एकूण जागा - 122
सर्वसाधारण एकूण जागा - 75
सर्वसाधारण खुला प्रवर्ग - 38
सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) - 37
नागरिकांचा मागास प्रवर्ग
एकूण जागा - 32
नागरिकांचा मागास प्रवर्ग - 16
नागरिकांचा मागास (महिला) - 16
अनुसुचित जाती एकूण जागा - 12
अनुसुचित जाती - 6
अनुसुचित जाती (महिला) - 6
अनुसुचित जमाती एकूण जागा - 3
अनुसुचित जमाती - 1
अनुसुचित जमाती (महिला) - 2