

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत येत्या 15 तारखेला शिवसेना/भाजपाचा महापौर बसविण्यासाठी एकीकडे महायुतीने कंबर कसली असतानाच अंबरनाथमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या भाजपाने शिंदे सेनेशी स्थानिक पातळीवर महायुतीसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. या घटनेचे पडसाद रविवारी सायंकाळी डोंबिवलीत पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात उमटले. या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सूचक उद्गार काढताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 122 उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.
भाजपा डोंबिवली शहर पूर्व मंडळाच्यावतीने रविवारी संध्याकाळी फडके रोडला अप्पा दातार चौकात कार्यकर्ता मेळावा तथा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 जागा आहेत. आरक्षणासह अन्य सगळ्या गोष्टी त्यामध्येच कन्सिडर आहेत. या महानगरपालिका क्षेत्रात भाजपाचे जवळपास दहा ते वीस हजार सक्रिय कार्यकर्ते आहेत. या निवडणुकीत 122 जणांना संधी मिळणार आहे. बाकीचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांना मोठे करणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमुळे आपण मोठे आहोत, ही भावना नेहमी मनामध्ये असणे आवश्यक असल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.
संपूर्ण देशभरामध्ये शंभर शहरांना स्मार्ट सिटी करण्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले होते. त्यात कल्याण-डोंबिवलीचा नंबर लागत नव्हता. देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. डोंबिवली शहर आपल्या विचारांचे असलेले शहर आहे. या शहराला स्मार्ट सिटीच्या शहरांमध्ये घ्यायला हवे. फडणवीस यांनी मागणी मान्य केल्यानंतर केंद्रातल्या त्या योजनेमध्ये कल्याण-डोंबिवलीला समाविष्ट करून घेण्यात आले. हे सर्व करण्यामागे, तसेच त्यासाठी शहरांवर प्रेम करणारा माणूस असावा लागतो. विचारधारेवरती प्रेम करणारा माणूस लागतो. कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटीत समाविष्ट करून घ्यावे, लागल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मेळाव्यात दिली.
...आणि महाराष्ट्र वीज भारनियमनमुक्त करण्याच्या वल्गना
काही मंडळी फक्त घोषणा करतात. मी कुणावर टीका करणार नाही. पण मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बारा/बाराला हा संपूर्ण महाराष्ट्र वीज भारनियमनमुक्त करीन, असे एका जेष्ठ नेत्यांनी म्हटले होते. पण ते करू शकले नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांची देण्याची दूरदृष्टी लक्षात घ्या, त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय बारकाईने विचार केला. वीज उत्पादन करणे आणि उत्पादनासाठी लागणारे पैसे यापेक्षाही विजेची बचत करता आली तर आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढता येऊ शकतो. त्या दिशेने त्यांनी एक एक पाऊल पुढे जात जात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरण ठरविले.
अपारंपारिक ऊर्जेतून वीज निर्मिती
प्रदूषणामुळे वीज निर्मितीची असणारी जी गरज लक्षात घेता ज्या इंधनांचा वापर होतोय ही सर्व इंधने वापरल्यामुळे प्रदूषण होत आहे आणि म्हणून अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करायला हवी, असा विचार पंतप्रधानांनी केला. परंतु त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाऊल कोणी उचलले. अपारंपारिक ऊर्जेच्या माध्यमातून आज वीज निर्मिती करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. गेली वीस वर्ष चढत्या क्रमाने विजेचे दर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिले आहेत. आज विजेचे दर कमी व्हायला लागले, त्यासाठी द्रष्टा नेता कसा असतो दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो त्याचे नाव केवळ देवेंद्र फडणवीस यांचे घेतले जाते, असे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना काढले.