

Nagar Parishad Election Results
राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचे आज (दि.२१) निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीस दहा वाजता प्रारंभ होणार आहे. आता या निकालापूर्वीच राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक भाकीत केले आहे.
"भाजपकडे आज सत्ता आहे, अफाट पैसा आहे आणि निवडणूक आयोगही त्यांच्याच बाजूने असल्याचे दिसते, असा टोला लगावात या बळावरच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरेल." असे भाकित वडेट्टीवार यांनी केले. निकाल थोड्या वेळात येणार आणि मी असं म्हणणार नाही की, काँग्रेस पार्टी नंबर एक वर राहील; पण तुम्ही सगळे या निकालानंतर चकित व्हाल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपला पहिल्या क्रमांकाचे स्थान दिले असले तरी, काँग्रेस पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारेल असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले राज्यातील २४६ नगरपरिषदांपैकी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असेल. विदर्भात काँग्रेसची कामगिरी अत्यंत प्रभावी राहील. येथील ३० ते ३२ नगरपरिषदांमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल शेतकरी, बेरोजगार तरुण आणि महिलांच्या संतापाचा व उद्रेकाचा आरसा असेल. ग्रामीण भागातील जनता आश्चर्यचकित करणारे निकाल देतील, मेट्रो शहराविषयी आम्ही फार बोलू शकत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
विदर्भातील सर्वाधिक नगरपरिषदा या काँग्रेसच्या ताब्यात दिसतील, महाराष्ट्रात प्रचंड पैशाचा पूर आणला गेला सत्तेचा दुरुपयोग केला गेला आहे. आम्ही जनतेच्या सहकार्याने कुठलेही बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक दोन पर्यंत पोहोचेल याचाच अर्थ जनतेच्या मनात काँग्रेस आहे आणि राहील.
नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत शिंदे शिवसेना तिसरा नंबर वर जाईल, सत्तेच्या विरुद्ध लढताना संपूर्ण राज्यात आमचे 16 आमदार आहेत फक्त सोळा आमदाराच्या बळावर आम्ही क्रमांक दोन वर पोहोचलो आहे. म्हणजे जनतेच्या मनातील महिलांच्या बेरोजगारांच्या तरुणांच्या मनातील तो उद्रेक असा त्याचा अर्थ निघेल आणि त्यापासून सत्ताधारी धडा घेतील, असा इशाराही त्यांनी दिला.