

Kalyan Dombivli Municipal Corporation
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या दोन्ही पदांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महापौर पदासाठी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थवील, तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून राहूल दामले यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
हे अर्ज शिवसेना, भाजप तसेच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील, भाजपचे नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. मात्र, दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारीरोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असतानाच महापौर आणि उपमहापौर पदांचा तिढा सुटला आहे. नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहरांच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.