

डोंबिवली : बजरंग वाळुंज
येत्या १४ तारखेला गणरायाचे आगमन होणार असून बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी आणि कल्याण-डोंबिवली भक्तिमय झाली असतानाच काही टवाळखोर आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून सणाचा गैरफायदा घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, हे लक्षात घेऊन जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या खास पथकांनी एका रात्रीत ३३ टवाळखोरांसह संशयित समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून कोठडीचा रस्ता दाखविला आहे.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांतील पथकांनी मंगळवार ते बुधवारच्या मध्यरात्रीत राबविण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी आणि गस्ती मोहिमेत पोलिसांनी अक्षरशः दंडुका गाजवला असून एकूण ३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात गुंड/गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सादर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, परिमंडळ ३ अंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी, खडकपाडा, मानपाडा, डोंबिवली (रामनगर), विष्णूनगर आणि टिळकनगर या आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई एकाच वेळी करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेत सर्वाधिक कारवाई ही गर्दीची आणि संवेदनशील ठिकाणे असलेल्या महात्मा फुले चौक आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यांच्या परिसरात करण्यात आली आहे, जिथे टवाळखोरी आणि अवैध धंद्यांचे प्रमाण अधिक असते.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, हद्दपारी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई पोलिस कायद्याचे कलम ३३ नुसार १३१ अंतर्गत एकूण १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी यात ८ जणांना ताब्यात घेऊन आघाडी घेतली आहे, तर खडकपाडा पोलिसांनी २ जणांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिस कायद्याचे कलम कलम ११२ आणि ११७ अंतर्गत एकूण ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ आणि खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिस कायद्याचे कलम ११० आणि १९ (ब) अंतर्गत महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका सराईत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम १०२ आणि ११७ अंतर्गत एकूण ८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
यात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६, कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ आणि डोंबिवली अर्थात रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ जणांवर कारवाईचा समावेश आहे. कोफ्ता कायद्याच्या कलम ४ आणि २१ अंतर्गत एकूण ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ आणि डोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय रस्त्यावर अडथळा निर्माण करणे या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
एनडीपीएस बाबतीत दिलासादायक चित्र
या धडक कारवाईत बाजारपेठ, मानपाडा, विष्णूनगर आणि टिळकनगर या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकही कारवाईची नोंद नसल्याने तेथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. तर एकूण कारवाईचा विचार करता महात्मा फुले चौक पोलिसांनी ११, कोळसेवाडी पोलिसांनी १३, खडकपाडा पोलिसांनी ४ आणि डोंबिवली पोलिसांनी ६ जणांवर कारवाई करत आपली कामगिरी चोख बजावली आहे. एनडीपीएस सारख्या गंभीर गुन्ह्यांत मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अमली पदार्थांच्या बाबतीतही सध्या तरी दिलासादायक चित्र आहे.
गणेशोत्सवात अफवांवर विश्वास नको
गणेशोत्सव काळात कल्याण-डोंबिवलीकरांनी कोणत्याही अफवा किंवा समाजकंटकांच्या दहशतीला बळी न पडता बिनधास्तपणे, उत्साहात सण साजरा करावा. तुमच्या एका हाकेवर, तुमच्या सुरक्षेसाठी कल्याण परिमंडळ ३ ची संपूर्ण पोलिस यंत्रणा सज्ज आहे. कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आमची करडी नजर आहे, असा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशीच कॉम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदीची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.