AC local technical fault : कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

एकाच दरवाजावर प्रवाशांची झुंबड; चेंगराचेंगरीजन्य स्थिती
AC local technical fault
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाडpudhari photo
Published on
Updated on

कल्याण /डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात एसी लोकलच्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी सकाळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांची जलद एसी लोकल प्लॅटफॉर्मवर आली असता तिचे बहुतांश दरवाजे उघडलेच नाहीत. परिणामी एकाच दरवाजातून प्रवाशांना आत जावे लागल्याने स्थानकावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

ऐन गर्दीच्या वेळी ही लोकल कल्याणला दाखल झाली. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ सुरू होती. मात्र लोकलचा केवळ एकच दरवाजा उघडल्याने हजारो प्रवासी त्या एकाच दरवाज्यावर जमा झाले. आत शिरण्यासाठी चढाओढ सुरू झाली आणि काही क्षणातच प्लॅटफॉर्मवर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

AC local technical fault
Virar road condition : वसई-विरारमधील रस्त्यांची दुरवस्था

पावसामुळे आधीच विस्कळीत झालेल्या वाहतुकीत वेळेत कामावर पोहोचण्याची घाई असल्याने प्रवाशांची मोठी कसरत झाली. स्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे पाहून रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांनी लाठीचार्ज न करता समजावून गर्दीवर नियंत्रण मिळवले. प्रवाशांना रांगेत उभे करून एका-एकाला आत सोडण्यात आले. सुमारे दहा मिनिटांच्या गोंधळानंतर दरवाजा सुरक्षितपणे बंद करून लोकलला पुढे रवाना करण्यात आले.

प्रवाशांनी सांगितले, जेव्हा ट्रेन कल्याण स्टेशनवर पोहोचली, तेव्हा ती कोपर व डोंबिवलीहून विरुद्ध दिशेने परतणाऱ्या प्रवाशांनी आधीच पूर्ण भरलेली होती. त्यानंतर अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा येथून प्रवासी ट्रेनमध्ये चढू लागले.

स्टेशनवर पोहोचल्यावर, लोकल ट्रेनचे काही दरवाजे अर्धवट उघडे होते, तर काही पूर्ण उघडे होते. प्रवासी त्या अर्धवट उघड्या दरवाज्यांमधून आत-बाहेर जाऊ लागले. ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अनेक प्रवासी दरवाजांना लटकले होते, ज्यामुळे चेंगरा चेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

बऱ्याच विलंबानंतर काही दरवाजे उघडले. प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी धावपळ केल्याने प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

AC local technical fault
Dhamani Dam : धामणी धरण तुडुंब; पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरपीएफचे जवान प्रत्येक डब्याच्या दरवाजाजवळ गेले, प्रवाशांना आत ढकलले आणि काहींना जबरदस्तीने खाली उतरवले, ज्यामुळे दरवाजे बंद झाले. त्यानंतर, नियंत्रण प्रणालीने एकाच वेळी सर्व दरवाजे बंद केले आणि लोकल ट्रेन रवाना झाली.

२० मिनिटे गोंधळ उडाला

वातानुकूलित लोकल ट्रेनमधील तांत्रिक बिघाडामुळे लोकलचे दरवाजे उघडत नसल्यामुळेे कल्याण स्टेशनवर सुमारे २० मिनिटे प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात, पाठीवर ओल्या छत्र्या आणि बॅगा घेतलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

जीवाच्या हमीचे काय?

या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या देखभाल आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रुपये खर्च करून सुरू केलेल्या एसी लोकलमध्ये जर दरवाजेच वेळेवर उघडत नसतील तर प्रवाशांच्या जीवाची हमी कोण देणार? असा सवाल प्रवाशांनी केला आहे. सकाळच्या सुमारास अशी घटना घडल्याने अपघात होण्याची भीती होती. रेल्वे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सर्व एसीची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news