

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील एम. के. कॉलेज परिसरात एका विद्यार्थ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आयान शेख असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात कुख्यात ड्रग्ज तस्कर अमजद पठाण याचा मुलगा आरिफ पठाण आणि त्याच्या एका साथीदाराचा सहभाग असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर एम. के. कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जखमी आयान शेख याच्यावर कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्राणघातक हल्ल्यात आरिफ पठाण आणि त्याच्या साथीदाराचा सहभाग असल्याचा आरोप आहे. आरिफ हा कुख्यात ड्रग्ज तस्कर अमजद पठाणचा मुलगा आहे. अमजद पठाणकडून यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. सध्या तो आपल्या साथीदारांसह तुरुंगात असल्याचे सूत्रांकडून समजते. त्याच्या मुलावर आता गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, आरिफ पठाणवरील आरोपांबाबतचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
एम. के. कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांची नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यावर अचानक तलवारीसारख्या धारदार शस्त्राने हल्ला झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांसह पालकांनी केली आहे. कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची गस्त वाढवावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हल्ल्यामागील नेमके कारण काय होते? हल्ल्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पोलिसांनी हस्तगत केले आहे का? याबाबत तपासातून माहिती समोर येणे बाकी आहे. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पोलीस आरिफ पठाण आणि त्याच्या साथीदाराविरोधात नेमकी काय कारवाई करतात, तसेच कॉलेज परिसरातील सुरक्षेसाठी कोणती अतिरिक्त पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.