

डोंबिवली : कल्याण पश्चिमेत सिंडिकेट भागात एका २५ वर्षीय तरूणीने जिममध्ये जाण्यासाठी भाड्याच्या दुचाकीची नोंदणी केली. काही वेळात भाड्याचा दुचाकीस्वार तरूणीला घेण्यासाठी या तरूणीजवळ पोहोचला. या तरूणीने विश्वास ठेऊन दुचाकीस्वाराच्या मागे बसली. प्रवासादरम्यान दुचाकीस्वाराने जिमच्या रस्त्याने न जाता पोलिस वसाहतीमधील अंधाऱ्या भागात तरूणीला नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा केल्यास ॲसिड फेकून चेहरा विद्रूप करीन, अशी या दुचाकीस्वाराने तरूणीला धमकी दिली. मात्र या रणरागिणीने आकांडतांडव करून दुचाकीस्वाराशी दोन हात केले. हे पाहून मदतीसाठी धाऊन आलेल्या परिसरातील रहिवाशांनी या बदमाशाची यथेच्छ धुलाई करून त्याला पोलिसांच्या हवाली केले.
सिध्देश संदिप परदेशी (१९, रा. खडकपाडा, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नावे आहे. पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील एम एच ०४/एम एम/३३६५ क्रमांकाच्या दुचाकीसह चाकू आणि स्प्रे बॉटल हस्तगत केली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात राहणारी तरूणी रिक्षाऐवजी ती भाड्याची रॅपिडो, ओला, उबेर दुचाकीची नोंदणी करून प्रवास करते. नेहमीप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जिममध्ये जाण्यास निघाली होती. थोड्या वेळाने रॅपिडोचा दुचाकीस्वार तिथे आला. त्याने या तरूणीला तिच्या घराजवळून दुचाकीवर बसविले. परंतु त्याने ओटीपी त्याच्या मोबाईलमध्ये घेतला नसल्याने तरूणीच्या मोबाईलवर मेसेज आला नाही. म्हणून त्याला या तरूणीने संपदा हॉस्पीटल समोर थांबवून ओटीपी मोबाईलमध्ये टाकावयास लावला.
त्यानंतर त्याने दुचाकी केडीएमसीच्या आयुक्त बंगल्यासमोरून सिंधीगेट चौकाकडे जात असताना अचानक त्याने दुचाकी भरधाव वेगात आईस फॅक्टरी समोरील पडक्या इमारतीच्या अंधाराकडे वळवली. त्याची ही हरकत पाहून तरूणीला संशय आला. तिने दुचाकीवरून खाली उडी मारली. यात तिच्या डावे पायास जखम झाली. तरीही हा बदमाश तरूणीच्या हाताला धरून खेचत अंधारात घेऊन गेला. निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी अंधाराचा फायदा घेत तरूणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरूणी त्याला कडाडून विरोध करत होती. त्यामुळे त्याने पेपर स्प्रे खिशातून काढला. हे ॲसिड आहे, ओरडलीस तर तोंडावर टाकीन, असे धमकावून खिशातून हिरवी मूठ असलेला स्टीलचा धारदार चाकू काढला. चाकूचा धाक दाखवून, चल पैसे दे असे धमकावून या तरूणीच्या गळ्यातील सोन्याची व मोत्याची माळ खेचली. या झटापटीत मोत्याची माळ तुटली. तरीही त्याने तरूणी जवळ असलेले एक हजार रूपये जबरीने खेचून काढून घेतले.
याच दरम्यान तरूणीने बचावासाठी ओरडाओरडा केला. हे पाहून परिसरातील रहिवाशांसह पादचारी तरूणीच्या मदतीसाठी धावले. जमावाला पाहून दुचाकीस्वाराने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. या दुचाकीस्वाराजवळ एक चाकू आणि स्प्रे बॉटल आढळून आली. त्यामुळे हा दुचाकीस्वार गुन्हेगार प्रवृत्तीचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
महिलांना सावधानतेचा इशारा
गेल्या आठवड्यात कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कल्याण शहर परिसरात नियमबाह्यपणे रॅपिडो सेवा देणाऱ्या ४७ दुचाकीस्वारांंवर कारवाई केली आहे. ही सेवा देणाऱ्या कंपनीच्या संचालकांवर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अशा भाड्याच्या दुचाक्या वा इतर खासगी माध्यमातून सेवा देणाऱ्या चालकांच्या साह्याने प्रवास करताना प्रवाशांनी , विशेषतः महिलांनी सावधनता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.