

बंगळूर; वृत्तसंस्था : बंगळूरच्या मध्यवर्ती परिसरात रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाकडून विनयभंग झाल्याचा एक धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 6 नोव्हेंबर) संध्याकाळी समोर आला आहे. एका महिलेने इन्स्टाग्रामवर आपला अनुभव कथन करणारा व्हिडीओ शेअर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या पोस्टवर बंगळूर शहर पोलिस आणि रॅपिडो कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे.
या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती चर्च स्ट्रीटवरून तिच्या पेईंग गेस्ट निवासस्थानाकडे जात असताना चालकाने अयोग्यरीत्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. “राइड चालू असताना कॅप्टनने माझ्या पायांना पकडण्याचा प्रयत्न केला. हे इतक्या अचानक घडले की मला प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळाला नाही,” असे तिने लिहिले. चालकाला थांबण्यास सांगितल्यावरही त्याने गाडी थांबवली नाही, ज्यामुळे ती खूप घाबरली. अनोळखी रस्ता असल्याने ती स्वतः बाईक थांबवू शकली नाही. गंतव्यस्थानी पोहोचल्यावर ती भीतीने थरथर कापत होती आणि रडत होती.
सहृदय नागरिक मदतीला धावला
सुदैवाने, एका जाणार्या माणसाने तिची अवस्था पाहून हस्तक्षेप केला आणि चालकाला जाब विचारला. चालकाने माफी मागितली; पण जाताना त्याने महिलेकडे विचित्र पद्धतीने बोट दाखवले, ज्यामुळे तिला अधिक असुरक्षित वाटले. बंगळूर शहर पोलिसांनी कमेंट सेक्शनमध्ये महिलेशी संपर्क साधून पुढील तपासणीसाठी माहिती विचारली आहे. रॅपिडोनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलेने अखेरीस पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे.