

डोंबिवली : मोबाईलवरील लुडो गेमच्या वादातून शाब्दिक चकमक झडली. त्यानंतरचा वाद शिगेला पोहोचला. या वादातून मामाने आपल्या बहिणीच्या मुलाचा अर्थात भाच्याचा काटाच काढला. मंगळवार-बुधवार दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच भाच्याला निर्दायी मामाने चाकूच्या साह्याने संपवून टाकले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे. क्षुल्लक पण विचित्र कारणावरून मामाने आपल्याच रक्ताच्या नात्याचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोखील भीम बहाद्दूर (१७) असे मृत भाच्याचे नाव असून खडकपाडा पोलिसांनी तात्काळ हालचाली करून खूनी मामा चित्रा बहाद्दूर याला अटक केली आहे. कल्याण पश्चिमेकडे असलेल्या उबार्डे कोळीवळी परिसरात राहणारा चित्रा आणि त्याचा भाचा गोखील हे दोघेही कोळीवळीतील रॉयल ढाबा येथे काम करतात. पहाटेच्या सुमारास त्याचा १७ वर्षीय भाचा गोखील बहादूर झोपेतून उठून मोबाईलमध्ये गेम खेळत होता. यावेळी मामाने त्याला गेम खेळू नकोस असे सांगितले. मात्र, याच कारणावरून मामा आणि भाच्यामध्ये वाद सुरू झाला.
गोखील आपल्या मामाकडे कोळीवळीतील घरी राहत होता. गोकुळला लुडो गेम खेळण्याची आवड होती. तो मोबाईलवर या लुडो गेममध्ये सतत व्यस्त असायचा. या व्यस्ततेमुळे सांगितलेली कामे गोकुळ करत नव्हता. लुडो गेम खेळण्यावरून मामा चित्रा आणि भाचा गोकुळ यांच्यात किरकोळ वाद सुरू झाला होता. हा खेळ खेळणे बंद कर, असे मामा भाच्याला निक्षून सांगत असे. मात्र या गेममुळे काही नुकसान होत नाही.
ते व्यसन नाही, असे भाचा आपल्या मामाला सांगण्याचा प्रयत्न करत असे. या लुडो खेळण्यावरून मामा चित्रा आणि भाचा गोखील यांच्यात सतत वाद सुरू झाले होते. समोरासमोर आले की त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होत असे. हा वाद इतका टोकाला गेला की मामाच्या मनात आपल्या भाच्याला संपविण्याचा विचार आला
असे घडले रक्तरंजित हत्याकांड
मंगळवारी रात्रीचे जेवण झाल्यावर गोखील गाढ झोपला होता. या संधीचा गैरफायदा घेत मामा चित्रा याने गोखीलला संपविण्याचा निर्णय घेतला. स्वयंपाक घरातून आणलेल्या चाकूने गोखीलवर झोपेत असतानाच सपासप वार केले. गंभीर स्वरूपात दुखापती होऊन रक्तस्त्राव झाल्याने गोखील झोपेतून जागा झाला आणि बेशुध्द पडला.
खोलीतून आवाज कसला येतो म्हणून कुटुंबीय जागे झाले, तेव्हा गोखील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कुटुंबीयांनी त्याला रूग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना देताच एकीकडे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गोखीलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात पाठवून दिला. तर दुसरीकडे गोखीलच्या खूनी मामा चित्रा याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. या प्रकरणी खुन्याच्या विरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.