Kalyan Crime : कल्याणात धक्कादायक प्रकार: पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीचा छळ; बाजारपेठ पोलिसांत तक्रार दाखल

Kalyan Crime
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील 'सर्वोदय सृष्टी' इमारतीत राहणाऱ्या सलमा जहांगीर खान यांनी पतीसह काही व्यक्तींविरोधात मानसिक त्रासासह पाठलाग केल्याचे गंभीर आरोप करत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या संदर्भात सलमा खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीने अन्य एका महिलेशी विवाह केला असून ती महिला त्यांच्याच शेजारी राहते. संबंधित महिलेच्या वडिलांकडून आपला सातत्याने पाठलाग केला जात असून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप सलमा यांनी केला आहे. तसेच स्वतःच्या व मुलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी भीती व्यक्त केली आहे. अनेकदा स्वतःला मुलांसह घरात कोंडून घ्यावे लागत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सध्या राहत असलेले घर सोडून जावे, जेणेकरून पतीने ज्या तरुणीशी दुसरे लग्न केले आहे तिला तेथे राहता येईल, यासाठी आपल्यावर सातत्याने दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी प्राथमिक स्वरूपाची नोंद घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुलांच्या आणि स्वतःच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी सलमा यांनी केली आहे.

परदेशी नागरिकाकडे भारतीय कागदपत्रे कशी?

संबंधित व्यक्ती परदेशी म्हणजेच दक्षिण आफ्रिकेची (South African) असल्याचा दावा सलमा खान यांनी केला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीकडे मतदार ओळखपत्रासह इतर भारतीय कागदपत्रे कशी आली, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या सर्व आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असून संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. या तपासात काय निष्पन्न होते आणि आपल्याला न्याय मिळतो का, याकडे पीडित विवाहितेचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news