

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हाॅटेलमध्ये तिघे जण १५ हजार रूपये ग्राहकांकडून घेऊन सेक्स रॅकेट चालवत असल्याची खबर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.
अनैतिक मानवी प्रतिबंधक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून संबंधित हाॅटेलवर छापा टाकून चार पिडीत तरूणींसह दोन महिलांना ताब्यात घेतले होते. तथापी कारवाई दरम्यान स्थानिक पोलिस अनभिज्ञ होते. या सेक्स रॅकेटमधील मुख्य सुत्रधार आश्चर्यकारकरित्या भूमिगत झाला होता. अनैतिक मानवी प्रतिबंधक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या कौशल्याने या फरार बदमाशाला आंंबिवलीतून अटक केली.
विनोद फननन मौर्या असे अटक करण्यात आलेल्या बदमाशाचे नाव आहे. कल्याणमधील एका हाॅटेलमध्ये दोन महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालविणारा विनोद मौर्या हा गेल्या महिनाभरापासून फरार होता. अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाचे पथक त्याच्या मागावर होते. पोलिसांनी यापूर्वीच कल्याण पूर्वेकडे असलेल्या वालधुनी भागात राहणारी सुनीता चंद्रकांत गोरे आणि उल्हानगरातील पंजाबी काॅलनीत राहणाऱ्या सरला आकाश भालेराव हिला अटक केली आहे. मात्र सेक्स रॅकेटचा मुख्य सुत्रधार विनोद मौर्या भूमिगत झाला होता फरार झाला होता.
पोलिसांना चकवा देणारा हा बदमाश कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या पंडित चाळीत येणार असल्याची खबर खासगी गुप्तहेरांकडून अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रध्दा कदम, हवालदार के. बी. पाटील, उदय घाडगे यांंनी आंबिवलीतील चाळीत लपलेल्या विनोद मौर्याच्या सापळा लावून मुसक्या आवळल्या.
गेल्या महिन्यात अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता, सरला आणि विनोद नावाचे इसम ग्राहकांना सुंदर मुुली शरीरसंबंधांसाठी पुरवतात आणि त्या बदल्यात ते ग्राहकांकडून १५ हजार रूपये घेत आहेत. हे सेक्स रॅकेट कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे भागात चालविले जात आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांंनी मार्चमध्ये कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक कौटुंबिक हाॅटेलवर धाड टाकून तेथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. सुनीता गोरे आणि सरला भालेराव या दोघी ग्राहकांकडून शरीर संबंधांसाठी १५ हजार रूपये घेत असल्याचे पथकाने केलेल्या कारवाईतून उघड झाले होते. पथकाने बनावट ग्राहक तयार केले होते. हे ग्राहक वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांच्या संपर्कात होते. सुंदर तरूणी शरीर संबंधांसाठी आम्ही पुरवितो आणि त्या बदल्यात पंधरा हजार रूपये घेतो. ते पैसे सरला किंवा सुरेखाला द्यायचे, असे विनोद ग्राहकांना सांंगत असे.
कल्याणमध्ये खुलेआम हा वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या त्रिकुटाला हाॅटेल चालकाची साथ होती का. सेक्स रॅकेट चालविण्यासाठी लागणाऱ्या तरूणी कुठून आणल्या जायच्या याचा तपास हे पथक करत आहे. या व्यवसायातून बक्कळ पैसा मिळत असल्याने आणि गरजू तरूणींनाही पैशांची गरज असल्यामुळे आपण हा व्यवसाय करत असल्याची कबुली हा व्यवसाय चालविणाऱ्या महिलेने पथकाला दिली.