Dombivali News: कल्याणकर हॉटेलमालकाची चेन हिसकावून परागंदा झालेले त्रिकुट जेरबंद

पाच महिन्यांपूर्वीच्या गुन्ह्याचा लावला छडा; कल्याणच्या एमएफसी पोलिसांची मुंबईत कारवाई
Dombivali News
Dombivali NewsPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: डान्सबारमध्ये अश्लील अंगविक्षेप करत थिरकणाऱ्या बारबालांवर नोटांची उधळण करण्यासाठी मुंबईतील तिघा बदमाशांनी वाममार्गाचा अवलंब सुरू केला. त्यासाठी या त्रिकुटाने कल्याणात येऊन एका वृद्ध हॉटेल मालकाला टार्गेट केले होते.

या मालकाच्या गळ्यातून सोन्याची चेन हिसकावून पसार झालेल्या तिघाही बदमाशांचा माग काढण्यात महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले. पोलिसांच्या खास पथकाने मुंबईतील एका बारमधून तिन्ही लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिलनवाज अब्दुल कय्युम अन्सारी (32), रिजवान याकुब खान (23) आणि शाहरूख सलीम शेख (30) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे असून हे तिघेही मुंबईच्या गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहणारे आहेत. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिघांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास 74 वर्षीय सी. जी. राजन हे कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग लेन नंबर 4 येथील सॉल्टी नावाचे हॉटेल बंद करून घरी जात होते. इतक्यात तिघांनी त्यांच्या गळ्यातील 10 तोळे वजनाची जवळपास 7 लाख रूपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला.

या प्रकरणी हॉटेल मालक राजन यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 304 (2), 3 (5) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी केली असता परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका दुचाकीवरून तिघेजण पळून जात असल्याचे आढळून आले. सदर दुचाकी जात असलेल्या सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता ही दुचाकी मुंब्र्याहून ठाण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.

Dombivali News
बेफाम वेग, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, रखडलेला महामार्ग, एसटीचा अनियंत्रीत ताळमेळ सर्वसामान्यांच्या जिवावर

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार विकास मडके, हवा. महेंद्र मंझा, निवृत्ती थेरे, आनंद कांगरे, काशिनाथ जाधव, किशोर सुर्यवंशी, दिपक थोरात आणि विकास सोळसे यांचे पथक तैनात केले. खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने मुंबईच्या गोवंडी परिसरातील एका बारमधून दिलनवाज अन्सारी, रिजवान खान आणि शाहरूख शेख या तिघांना ताब्यात घेतले.

Dombivali News
मिरा-भाईंदरच्या प्रलंबित विकास आराखड्याला तात्काळ अंतिम मंजुरी द्या; प्रताप सरनाईक यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

कल्याणात लूट केल्याची कबुली

विशेष म्हणजे या तिघाही बदमाशांना डान्सबारमध्ये जाऊन तेथील बारबालांवर नोटांची उधळण करण्याची सवय लागली होती. त्यासाठीच हे तिघे मिळून चोऱ्या आणि लूटमार करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. चौकशी दरम्यान या तिघा बदमाश्यांनी कल्याणकर हॉटेल मालक सी. जी. राजन यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबविल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून आतापर्यंत 6 लाख 76 हजार रूपये किंमतीची 52 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे. या त्रिकुटाने आतापर्यंत आणखी किती चोऱ्या आणि लूटमार केल्या आहेत ? याचा सखोल तपास फौजदार विकास मडके आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news