

डोंबिवली: कल्याण पश्चिमेकडे असलेल्या भगवा तलाव परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास रक्तरंजित थरारक घटना घडली आहे. व्यावसायिक वादातून एका तरूणावर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना मंगळवारी रात्री घडली.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चारही हल्लेखोरांना बेड्या ठोकून गजाआड केले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या ओमकार विठ्ठल सुरेश (22) याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याणच्या काळा अर्थात भगवा तलाव परिसरात मोमोज विक्रेता ओमकार आणि त्याचा भाऊ उमेश हे दोघे दुकान बंद करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी जात होते.
त्याचवेळी त्यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी असलेले मुरली नाडेकर, किरण नाडेकर, भावेश नाडेकर आणि हरदीप प्रजापती या चौघांनी ओमकारला गाठले. व्यावसायिक वादातील पूर्वीच्या रागातून या चौघांनी वाद उकरून काढला.
दोन गटांमध्ये प्रथम शाब्दिक चकमक झडली. वाद विकोपाला गेल्यानंतर नाडेकर टोळीतील चौघांनी मिळून ओमकारवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ओमकार गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ झालेल्या ओमकारला पाहून चारही हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
व्यावसायिक स्पर्धेतील वादाने गाठले शेवटचे टोक
जखमी ओमकारला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी जखमी ओमकारच्या जबानीवरून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास चक्रांना वेग देऊन पोलिसांनी अवघ्या काही तासांतच हल्लेखोर मुरली नाडेकर, किरण नाडेकर, भावेश नाडेकर आणि हरदीप प्रजापती या चारही हल्लेखोरांना अवघ्या काही तासांतच जेरबंद केले. प्राथमिक चौकशीत हा वाद व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यातआले. या प्रकरणी पुढील तपास महात्मा फुले चौक पोलिस करत आहेत.