

मिरा रोड (ठाणे ) : महाराष्ट्रात काही दिवसापासून वादळी वारे सुरू होते. वादळी वास्यानंतर मिरा भाईंदर सह इतर ठिकाणी मासेमारीला सुरुवात झाली आहे. बऱ्याच दिवसानंतर आता मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर मीरा भाईंदरमधील मच्छीमारांच्या जाळ्यात जेलीफिश मासे लागत असल्याने मोठे नुकसान होत असल्याने मच्छीमारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरवर्षी ऑगस्ट महिन्यात मासेमारी हंगाम सुरु होतो. यावर्षी मासेमारी हंगाम सुरु झाला त्यानंतर काही दिवस मच्छिमारांनी मासेमारी केली. त्या कालावधीत हवे तसे मासे मिळाले नाही. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले. परंतु त्यानंतर काही दिवसात वादळी वारे व जोरदार पाऊस सुरू झाला. यावर्षी पावसाळा जास्त लांबल्याने वादळी वारे सुरू झाल्यामुळे काही दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली. त्यामुळे मच्छीमारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी मच्छिमारांनी शेतकऱ्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
परंतु शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे अनेक मच्छिमार व्यावसायिकावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. आता बऱ्याच दिवसानंतर मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. परंतु मासेमारीसाठी गेलेल्या नौकेत सर्वात जास्त विषारी असलेले जेलीफिश मासे जाळ्यात लागत आहेत. मासे जाळ्याला मोठ्या प्रमाणात लागल्याच्या खुशीत असलेला मच्छीमार जेलिफिश मासे पाहून दुःखी होताना दिसत आहे. हे मासे पकडुन पुन्हा समुद्रात सोडावे लागत आहेत.
हे मासे विषारी असल्याने मासे सोडताना अनेकांच्या हाताला दुखापत झाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. यामुळे मच्छीमारांवर वादळी वाऱ्यानंतर पुन्हा संकट आले आहे. असेच होत राहीले तर मासेमारीसाठी होणारा खर्च देखील निघत नसल्याने आणखी नुकसान होऊन मच्छीमारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येइल, असे मच्छीमार करणाऱ्या बांधवांनी सांगितले आहे.