

Jameel Shaikh murder case
ठाणे : राबोडी येथील कार्यकर्ता जमील शेख याच्या हत्याप्रकरणात अटक केलेल्या मारेकऱ्याने जाहीरपणे नाव घेतल्यानंतरही पोलीस कारवाई करीत नाहीत. एवढेच काय, कोर्टाच्या आदेशानंतरही पोलीस मुख्य सूत्रधाराला अटक करीत नाहीत. हा प्रकार म्हणजे पोलिसांकडूनच कायद्याची हत्या करण्यासारखे आहे, असा आरोप डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.
काही वर्षांपूर्वी राबोडी येथील मनसेचे कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मुलीला दहावीच्या परिक्षेत 90% गुण मिळाल्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड हे तिचे कौतूक करण्यासाठी जमीलच्या घरी गेले होते. या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे आरोप केले.
डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जमीलच्या दोन्ही मुली प्रचंड हुशार आहेत. पैशाअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी मी आणि सुहास देसाई यांनी दहावी पास झालेल्या मुलीच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याचे ठरविले आहे.
मुख्य आरोपी नजीब मुल्ला यांना अटक झालेली नाही, असा प्रश्न विचारला असता, पोलिसांच्या चौकशीवरच आम्हाला विश्वास नाही. एफआयआरमध्ये नाव असताना ते आरोपपत्रातून गायब केले जाते. असे नाव गायब करणे कायदाबाह्य आहे. म्हणून पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे रहात आहे. मारेकरी सुपारी देणा-याचे नाव सांगत असतानाही पोलीस सूत्रधाराला अटक करीत नाहीत, हे चौकशी अधिकारी आणि गुन्हेगारांची हातमिळवणी झाल्याचेच द्योतक आहे. हे अधिकारी आणि आरोपी एकमेकांना भेटत होते, हे मोबाईल टॉवर लोकेशन तपासल्यावर स्पष्ट होईल, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.